गेल्या वर्षीपासून दहीहंडीचा एक आगळा वेगळा कार्यक्रम प्रो गोविंदा स्पर्धा आमदार प्रताप सरनाईक व प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक व राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. मागील वर्षी प्रो गोविंदा स्पर्धेला फार मोठा प्रतिसाद मिळाला होता. या वर्षीही प्रो गोविंदा (Pro Govinda) सीझन २ स्पर्धा दि. १८ ऑगस्ट, २०२४ रोजी NSCI डोम, वरळी येथे होत आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
(हेही वाचा – कानपूरजवळ Sabarmati Express चे २२ डबे घसरले; घातपाताचा संशय)
उदय सामंत म्हणाले, प्रो गोविंदा सीझन २ च्या प्राथमिक फेरीत ३२ संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम फेरीत १६ संघांचा समावेश आहे. मागील वर्षापेक्षा जास्त बक्षीस देण्याचा निर्णय संयोजकांनी व राज्य शासनाने घेतला आहे. प्रथम बक्षीस २५ लाख रुपये, द्वितीय बक्षीस १५ लाख रुपये, तृतीय बक्षीस १० लाख रुपये तर चौथे बक्षीस ५ लाख रुपये देण्यात येणार आहे. उर्वरित १२ संघांना प्रत्येकी १ एक लाख रुपये दिले जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
प्रो गोविंदा स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद लाभत आहे. पुढील काळात या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय स्वरुप प्राप्त होईल, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.
विम्याचा १ लाख गोविंदांना फायदा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे क्रीडाप्रेमी असल्याने त्यांनी गोविंदांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या. त्यामधील गोविंदांच्या विम्याची मागणी होती. त्यासाठी राज्य शासनाने ५६ लाख रुपये भरले आहेत. या विम्याचा १ लाख गोविंदांना फायदा होणार आहे. दहीहंडी हा पारंपारिक खेळ असून त्याचा क्रीडा प्रकारात समावेश करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.
आमदार प्रताप सरनाईक, पुर्वेश सरनाईक व दहीहंडी समन्वय समितीने अतिशय चांगल्या पद्धतीची नियमावाली ठरवून मागील वर्षापासून प्रो गोविंदा स्पर्धा सुरू केली. यावर्षीही प्रो गोविंदा सीझन २ स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभेल अशी राज्य शासनाला पूर्ण खात्री आहे. प्रो गोविंदा सीझन २ च्या अंतिम फेरीतील १६ संघांना शुभेच्छा उदय सामंत यांनी दिल्या. प्रो गोविंदा सीझन २ स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्टस् वाहिनीवर होणार आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाला जावा
या वेळी आमदार प्रताप सरनाईक प्रसार माध्यमांना संबोधित करताना म्हणाले, उत्साहाचा आणि अभिमानाचा दहीहंडी हा सण आहे. २७ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्र भर हा उत्सव साजरा होईल परंतु दहीहंडीचे रूपांतर क्रीडा प्रकारात व्हावे याकरिता गेल्या १० वर्षांपासून मी प्रयत्न करत होतो. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालना मिळाली. गेल्या वर्षीपासून सन्मानीय मुख्यमंत्री साहेबांनी प्रो गोविंदाला मान्यता देऊन हा क्रीडा प्रकार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाला जावा असे सांगितले. गोविंदांना ईजा होऊ नये याकरिता आम्ही शासनातर्फे प्रो गोविंदा सीझन २ करिता विशेष नियमावली आणि खबरदारी घेतली आहे, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
आयपीएल, प्रो कब्बड्डी याप्रमाणे प्रो गोविंदाला (Pro Govinda) सुद्धा एक विशिष्ट स्तरावर घेऊन गेलो आहोत. या स्पर्धेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, क्रीडामंत्री संजय बनसोडे हे जातीने लक्ष घालत आहेत. याबद्दल सर्व मंत्री महोदयांचे प्रताप सरनाईक यांनी आभार मानले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community