MHADA : पहाडी गोरेगावातील म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय, तर हे वाचाच…!

15558
MHADA : पहाडी गोरेगावातील म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय, तर हे वाचाच…!

म्हाडाच्या (MHADA) घरांच्या सोडतीत गोरेगाव येथील घरांसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थींना प्रत्यक्षात समस्यांनाच सामोरे जाण्याची वेळ आली आहे. म्हाडाच्या या पंचतारांकित प्रकल्पातील पात्र सदनिका धारक हे पाण्याचा अपुरा पुरवठा, घरातील गळती, एसटीपी प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसणे या आदी समस्यांमुळे हैराण असून तब्बल ५० लाखांहून अधिक पैसे देऊनही येथील सदनिकाधारकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, घराचा ताबा दिल्यानंतर म्हाडाने या पात्र कुटुंबांच्या समस्यांचे निराकरण करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर म्हाडा घर विकते की घरासोबत समस्याही असा प्रश्न येथील लाभार्थ्यांच्या मनात निर्माण होऊ लागला आहे

एकीकडे यंदाच्या नव्या सोडतीमध्येही पुन्हा म्हाडाने (MHADA) ‘परवडणारी घरे’ म्हणून जाहीर केलेल्या सोडतीत विविध उत्पन गटांमध्ये सदनिका घेण्यासाठी धडपड सुरु आहे. दरम्यान गोरेगाव येथील म्हाडाच्या ४१६ क्रमांकाच्या प्रकल्पात सुमारे २ हजार ६८३ सदनिका आहे, त्यातील अल्प उत्पन्न गटातील ७३६ असून प्रधानमंत्री आवास योजनेतील १ हजार ९४७ सदनिका आहेत. या दोन्ही गटातील सुमारे आठ हजारांहून अधिक नागरिक प्रकल्पात वास्तव्यास आहेत. २०२३च्या सोडतीमधील या घरांच्या किंमती अनुक्रमे ४६ लाख व ३० लाख रुपये इतकी होती.

(हेही वाचा – CM Eknath Shinde : सरकारने घेतला खड्ड्यांचा धसका; खड्डेमुक्त रस्त्यांसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन)

या प्रकल्पात नोव्हेंबर २०२३ मध्ये पात्र सदनिका धारकांनी सदनिकेचा ताबा घेत सर्व प्रक्रिया केल्यानंतर तिथे गेल्यानंतर तेथील समस्यांमुळे म्हाडाचे (MHADA) घर नको असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. केवळ ५-६ महिने २४ पाणी पुरवठा करण्यात आला. रहिवाशांना दिवसातून केवळ एक तास पाणीपुरवठा केला जातोय. याविषयी, मागील काही महिन्यांपासून म्हाडा, मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा करुनही कोणतीही ठोस भूमिका वा निर्णय घेतला जात नाही.

टाकी बसवणार तरी कुठे ?

प्रकल्पाचे विकासक असणाऱ्या शिर्के बिल्डरने या इमारतीतील सदनिकांमध्ये पाण्याच्या साठवणुकीसाठी टाकी बसविण्याची व्यवस्था केलेली नाही. मात्र पाण्याच्या समस्येमुळे सदनिकांमध्ये अंतर्गत मोडतोड करुन टाकी बसविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, आता पावसाळा संपण्याच्या वाटेवर आलेला असतानाही या समस्येवर यंत्रणेची उदासिन भूमिका पाहून सदनिकाधारक हतबल झाले आहेत.

(हेही वाचा – Kolkata Doctor Rape case प्रकरणी राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यात जुंपली)

एसटीपी प्रकल्पातून दुषित पाणी पुरवठा अन् दुर्गंधी

प्रकल्पातील वापराच्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी एसटीपी प्रकल्प सुरु करण्यात आला. मात्र तो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसल्याने सदनिकांमध्ये पुरवठा होणारे पाणी अत्यंत अस्वच्छ आणि दूषित आढळून येते. या पाण्याचा पुरवठा बाथरुममधील फ्लशसाठी करण्यात येतो, परंतु गेले काही महिने येथील सदनिकांमध्ये फ्लशमध्ये पाणीच येत नाही. त्यामुळे या समस्येकडेही यंत्रणेचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला असता कुठलीही दाद मिळाली नाही. तसेच, या प्रकल्पामुळे आवारात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीही पसरलेली आहे.

नागरिकांचे म्हणणे…

म्हाडा (MHADA) प्रशासन मध्यमवर्गीयांसाठी घरे मिळवून देणारे म्हणून ओळखले जाते. त्यामुळे सोडतीत आयुष्यभराची जमापुंजी देऊन येथे सदनिका घेतल्या आहेत. परंतु, या ठिकाणी राहण्यास आल्यानंतर समस्यांचा पाढा संपत नाही. त्यामुळे नव्या सोडतीमध्येही सदनिकांची जाहिरात बघून हुरळून न जाता नागरिकांनी योग्य निर्णय घ्यावा. म्हाडा, पालिका, लोकप्रतिनिधींकडून मिळणाऱ्या आश्वासनांमुळे आता येथील सदनिकाधारक अत्यंत उद्विग्न झाले आहेत. या समस्यांचे निराकारण होण्यासाठी सदनिकाधारकांनी म्हाडा प्रशासनाला अनेकदा पत्र व्यवहार केला, शिवाय स्थानिक लोकप्रतिनिधींकडे गाऱ्हाणे मांडले. मात्र असे असूनही परिस्थिती जैसे थे आहे, असे म्हणणे आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.