म्युकरमायकोसिस रोगाचा प्रसार देशभरात मोठ्या प्रमाणात होत आहे. या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एकट्या महाराष्ट्रात ७ हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यात धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये लहान मुलांचा समावेश होऊ लागला आहे. मागील आठवड्याभरात मुंबईत म्युकरमायकोसिसची लागण झालेल्या ३ अल्पवयीन मुलांचे डोळे काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आढळून आला आहे.
धक्कादायक माहिती समोर
मुंबईसह देशभरात म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीजन्य आजाराने कहर केला आहे. मुंबईत तर म्युकरमायकोसिसमुळे तीन बालकांना आपले डोळे गमवावे लागले आहेत. इतकंच नाही तर एका मुलीला डायबेटिसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे याबाबत लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. मुंबईतील खासगी रुग्णालयातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. डोळे गमावलेली तिन्ही मुले केवळ 4, 6 आणि 14 वर्षांची आहेत. त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 आणि 6 वर्षाच्या मुलांमध्ये डायबेटिसची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र, 14 वर्षावरील मुलाला डायबेटिसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्याशिवाय एका 16 वर्षाच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाली होती आणि कोरोनातून बरे झाल्यानंतर तिला डायबेटिस झाला. त्यानंतर तिच्या पोटात ब्लॅक फंगस आढळून आला होता.
(हेही वाचाः म्युकरमायकोसिस झाला, दीड कोटींचा खर्च केला, तरीही डोळा गमावला! )
जीव वाचला पण…
मुंबईतील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी याबाबतची माहिती दिली. या वर्षात रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे दोन रुग्ण दाखल झाले होते. ही दोन्ही मुले अल्पवयीन होती. त्यातल्या 14 वर्षांच्या मुलीला डायबेटिस असल्याचे तपासणीत आमच्या लक्षात आले, तिची प्रकृती गंभीर होती. रुग्णालयात भरती झाल्यानंतर अवघ्या 48 तासांत या मुलीमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसून आली. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार या मुलीचे डोळे काढण्यात आले, त्यानंतर सहा आठवडे तिची देखभाल करण्यात आली. सुदैवाने तिच्या डोक्यापर्यंत इन्फेक्शन पोहोचले नाही. पण तिला आपले डोळे मात्र गमवावे लागले, असे या डॉक्टरांनी सांगितले.
जीव वाचवणं कठीण होतं
16 वर्षाची मुलगी होती तिला डायबेटिस झाला नव्हता. पण कोरोनातून बरे झाल्यानंतर तिच्यामध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळून आली. ब्लॅक फंगस तिच्या पोटापर्यंत गेला होता. मात्र, नंतर ती बरी झाली. तर, 4 आणि 6 वर्षांच्या या दोन मुलांवर इतर खासगी रुग्णालयात उपचार झाले. या रुग्णालयाच्या मते या दोन्ही मुलांचे डोळे काढले नसते, तर त्यांचा जीव वाचवणं कठीण होतं.
(हेही वाचाः म्युकरमायकोसिसचे ‘अॅम्फोटेरसीन-बी’ आयात करा! उच्च न्यायालयाची सूचना )
Join Our WhatsApp Community