मुकेश अंबानी स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस वाढत आहे. सचिन वाझेच्या अटकेनंतर एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला एनआयएने गुरुवारी ताब्यात घेतले. आता एनआयए मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या तळाशी जात असून, आता मनसुखच्या मृत्यूनंतर त्याचा डायटॉम रिपोर्ट बनवणारे डॉक्टर आता एनआयएच्या रडारवर आहेत.
एनआयएला संशय
4 मार्चला मनसुखची आधी हत्या करण्यात आली आणि त्यानंतर त्याचा मृतदेह मुंब्रा खाडीत फेकण्यात आला, असे एनआयएने न्यायालयाला सांगितले. एनआयएच्या तपासाच्या आधारे मनसुखची पाण्याच्या बाहेरच हत्या करण्यात आली होती, तरी त्याचा डायटम रिपोर्ट कसा काढण्यात आला हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याच संशयाच्या आधारे डायटम रिपोर्ट बनवणारे डॉक्टर आता एनआयएच्या रडारवर आहेत. पोस्टमार्टम आणि डायटम रिपोर्ट करताना जे-जे लोक तिथे उपस्थित होते, ते सगळे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्या अनुषंगाने तपास सुरू असून, एनआयए कडून कारवाई होण्याची शक्यता आहे.
(हेही वाचाः प्रदीप शर्माला अखेर अटक! )
डायटॉम रिपोर्ट म्हणजे काय?
नदी, नाले किंवा समुद्रात मृतदेह सापडला की डायटॉम रिपोर्ट काढला जातो. मृत व्यक्तीचा पाण्यात पडल्यानंतर मृत्यू झाला, की मृत्यू झाल्यावर त्याला पाण्यात फेकण्यात आले, हे शोधण्यासाठी डायटम चाचणी केली जाते. डायटॉम्सची भिन्न वैशिष्ट्ये सर्वत्र पाण्यात आढळतात. अशा परिस्थितीत जिथे जिथे मृत शरीर सापडेल, तेथे मृत व्यक्तीच्या शरीरात सापडलेले पाण्याचे नमुने आणि पाण्यामधील डायटॉम मिळते जुळते असतील, तर डायटॉम अहवालानुसार मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो. आणि जर हा अहवाल नकारात्मक आला तर संशयास नक्कीच जागा आहे. कारण जर एखाद्या व्यक्तीची आधीच हत्या झाली असेल आणि नंतर तिचा मृतदेह पाण्यात फेकला गेला असेल, तर ते पाणी त्याच्या शरीरात जात नाही आणि डायटॉम अहवाल नकारात्मक येतो.
मनसुखच्या हत्येमागे यांचा हात
एनआयएने प्रदीप शर्मा याच्यासह मनीष सोनी आणि सतीश या तिघांना गुरुवारी अटक केली. या तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. मनीष आणि सतीश हे दोघे प्रदीप शर्मासाठी काम करत असून, त्याचे पंटर म्हणून ते ओळखले जातात. मनसुख हिरेन याच्या हत्येत या दोघांचा समावेश आहे. विनायक शिंदेसह मनीष आणि सतीश मनसुखला मारण्यासाठी एका कारमध्ये होते व त्यांनीच मृतदेह खाडीत फेकला होता. ज्या तवेरा गाडीत मनसुखची हत्या झाली, ती गाडी आरोपी संतोष शेलारची आहे. या गाडीच्या फॉरेन्सिक तपासणीनंतर काही महत्वाचे डीएनए मिळाले, जे या आरोपींचे आहेत ते महत्वाचे पुरावे आहेत, असे एनआयएने न्यायालयाला सांगितले.
(हेही वाचाः मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनील मानेचा असा आहे थेट संबंध!)
Join Our WhatsApp Community