Independent Candidates : येणाऱ्या विधानसभेत अपक्षांना सुगीचे दिवस?

88
Independent Candidates : येणाऱ्या विधानसभेत अपक्षांना सुगीचे दिवस?

महायुती आणि महाविकास आघाडीतील मोठ्या राजकीय पक्षांमध्येच विधानसभा जागांवाटापावरून रस्सीखेच सुरू असल्याने घटक पक्षांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. घटक पक्षांमध्येही यामुळे नाराजीचा सूर असून अनेक आमदार बंडाच्या तयारीत आहेत तर लहान पक्ष अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. परिणामी, येत्या विधानसभेत अपक्ष आमदारांना सुगीचे दिवस येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (Independent Candidates)

महायुती-महाविकास आघाडीशिवाय अनेक पक्ष

राज्यात महायुतीतील भाजपा, शिवसेना (शिंदे), अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांच्याशिवाय वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती, वसईच्या ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी, राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच छत्रपती संभाजी राजे, रवी राणा, सदभाऊ खोत यांचे पक्ष निवडणूक रिंगणात असणार आहेत. (Independent Candidates)

(हेही वाचा – Badlapur School Case प्रकरणात उद्धव ठाकरेंनी खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणे अशोभनीय; देवेंद्र फडणवीस यांचे मत)

मराठा-ओबीसी प्रभाव

अशा लहान-मोठ्या पक्षांच्या भाऊगर्दीत येत्या विधानसभा निवडणुकीत आणखी दोन घटक महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि दोन वेळा निवडणूक हरलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा प्रभाव निवडणुकीत निश्चित दिसेल, असे राजकीय वातावरण दिसत आहे. जरांगे यांचा प्रभाव गेल्या लोकसभा निवडणुकी दिसून आल्याने त्यांचा धसका काही राजकीय पक्षांनी घेतला आहे. (Independent Candidates)

युती-आघाडीतही नाराजांचा सुळसुळाट

प्रमुख सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्येदेखील जागावाटापावरुन हमरी-तुमरी सुरू झाली असून वेळप्रसंगी युती तोडण्याची भाषा केली जात आहे. सत्ताधारी ‘शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी’ नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याने निवडणुकीत त्याचे विपरीत परिणाम दिसण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी आपलेच नाव जाहीर करावे यासाठी काँग्रेस आणि शरद पवार यांना वेठीस धरण्यास सुरुवात केली आहे. यामुळे काँग्रेस-उबाठा-राष्ट्रवादीत ‘पाडापाडी’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच तिकीट न मिळाल्याने नाराज उमेदवारांकडून अपक्ष म्हणून निवडणूक लढणाऱ्यांची संख्या यावेळी अधिक असण्याची दाट शक्यता आहे. (Independent Candidates)

(हेही वाचा – Sanjay Raut यांना नवाब मलिक यांचा पुळका)

अपक्षांच्या ‘कुबड्या’

एकूणच घटक पक्ष, लहान पक्ष, नाराज, अपक्ष यांच्या लढतीमुळे पुढील विधानसभेत अपक्ष आमदारांना सुगीचे दिवस येणार एवढे नक्की. कदाचित, महायुती आणि महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळाले नाही तर अपक्षांच्या कुबड्या घेऊनच सरकार स्थापन करण्याची वेळ येऊ शकते. (Independent Candidates)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.