सत्ताधारी पक्षातील प्रमुख नेत्यांनी गुंडगिरीचं समर्थन करणं हे लोकशाहीचं अध:पतन आहे. सेना भवनबाहेर राडा केलेल्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. त्यामुळे राज्यात शिवशाहीचे राज्य आहे की गुंडशाहीचे? याचा विचार करण्याची आवश्यकता आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
लोकशाहीला शोभणारे नाही
प्रविण दरेकर यांनी माध्यमांसोबत बोलताना शिवसेनेवर हल्लाबोल केला. दरेकर म्हणाले की, संजय राऊत यांनी या संदर्भात बोलत असताना शिवसेना भवनाबाहेर राडा केलेल्या शिवसैनिकांचे कौतुक केले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या शिवसैनिकांचे कौतुक करतात, हे लोकशाहीला शोभणारं नाही आहे. एका बाजूला सत्ताधारी कायदा आणि सुव्यवस्था राखणे आपलं काम आहे हे बोलत असताना, दुसऱ्या बाजूला त्याच्याशी विसंगत वागणा-यांचे समर्थन करतात. त्यामुळे हे राज्य नेमंक शिवशाहीचे की गुंडशाहीचे? असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला.
(हेही वाचाः ‘त्या’ शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांकडून सत्कार! )
सरकारमध्ये समन्वयाचा अभाव
पंढरपुरच्या पोट निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभव सहन करावा लागला. या संदर्भात बोलताना दरेकर म्हणाले की, पंढरपूरच्या पराभवानंतर भाजपचा चढता आलेख रोखण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे. मतदारसंघ छोटे केले तर आमिष, धाकदपटशाही या जोरावर निवडणूक जिंकता येईल यासाठी प्रभाग रचना बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायची की नाही, या संभ्रमात आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाचा त्यांचा उमेदवार ठरत नाही. महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ नाही आणि समन्वयाचा अभाव आहे, असे दरेकर यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community