डॉ. तावडे, भावे, पुनाळेकर या निरपराध्यांचे जीवन उद्ध्वस्त केल्याप्रकरणी अंनिस माफी मागणार का?; Abhay Vartak यांची मागणी 

182

डॉ. दाभोळकर आणि पानसरे हत्या प्रकरणात सनातन संस्थेला दोषी ठरवून ‘बळीचा बकरा’ बनवण्याचा प्रयत्न झाला. डॉ. दाभोलकर प्रकरणात 10 मे 2024 ला न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार तिघांना निर्दोष मुक्त केले आणि दोघांना ठरवण्यात आले. यामध्ये हिंदु जनजागृती समितीशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सनातन संस्थेचे विक्रम भावे आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे ॲड. संजीव पुनाळेकर यांनाही निर्दोष मुक्त करण्यात आले. डॉ. तावडे यांना या प्रकरणात 8 वर्षे नाहक तुरुंगवास भोगावा लागला, हा त्यांच्यावरील अन्याय आहे. डॉ. तावडे यांच्याविरोधात ‘सीबीआय’ ठोस पुरावे सादर करु शकली नाही, हा अजून घोर अन्याय आहे.

विक्रम भावे यांना 2 वर्ष, तर ॲड. संजीव पुनाळेकर यांनाही 42 दिवस तुरुंगात रहावे लागले. या तिघांच्या जीवनात झालेले व्यक्तिगत नुकसान कोण भरून देणार? या प्रकरणात निर्दोष सुटलेले डॉ. तावडे, भावे, ॲड. पुनाळेकर या निरपराध व्यक्तींचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केव्हा होणार?, विवेकाचा आवाज म्हणवणारे ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ या विषयी जाहीर माफी मागणार का? असा प्रश्न सनातन संस्थेचे धर्मप्रचारक अभय वर्तक (Abhay Vartak) यांनी उपस्थित केला. सनातन संस्थेच्या वतीने ‘अंधश्रद्धा निर्मूलन?…कि छुपा अर्बन नक्षलवाद?’ या विषयावर दादर (प.) येथील कित्ते भंडारी सभागृह येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता ॲड. संजीव पुनाळेकर आणि  प्रख्यात सर्जन आणि लेखक डॉ. अमित थडानी यांनी सुद्धा या वेळी संबोधित केले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिवक्ता, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंनिस नास्तिकवादाचा प्रसार करणारी श्रद्धाविरोधी चळवळ 

अभय वर्तक पुढे म्हणाले, ‘सनातन संस्थेला दोषी ठरण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि ‘अर्बन नक्षलवाद्यां’चे षड्यंत्र विफल झाले. याप्रमाणेच सनातन धर्म नष्ट करण्यासाठी अर्बन नक्षलवाद्यांकडून सातत्याने षडयंत्रे चालू आहेत. 11 ऑगस्ट 2012 ला मुंबईच्या आझाद मैदानमध्ये धर्मांध मुसलमानांनी केलेल्या दंगलीत पोलीस, पत्रकार यांच्यावर हल्ले झाले होते, महिला पोलिसांचा विनयभंग केला. 12 वर्षे झाली, तरी त्या दंगलखोरांवर ठोस कारवाई नाही, मात्र याविषयी कोणी बोलताना दिसत नाही. मॉर्निंग वॉक निघत नाही; मात्र ‘हेटस्पीच’चे गुन्हे हिंदुत्वनिष्ठ नेत्यांवर दाखल करण्यामागे अर्बन नक्षलवादी जोमाने कार्यरत आहेत. ज्यांच्या संघटनेचे पूर्वाश्रमीचे नाव ‘मानवीय नास्तिक मंच’ होते, ती मंडळी आज ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या नावाने नास्तिकवादाचा प्रसार करणारी श्रद्धाविरोधी चळवळ राबवत आहेत. धर्म न मानणार्‍या चळवळींपासून समाजाने दूर रहावे; कारण ती चळवळ नुसती धर्मविरोधी नाही, तर देशविरोधी सुद्धा आहे, असे अभय वर्तक (Abhay Vartak) म्हणाले.

(हेही वाचा Badlapur School Case प्रकरणात उद्धव ठाकरेंनी खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणे अशोभनीय; देवेंद्र फडणवीस यांचे मत)

हिंदूनीही स्वत:ची ‘इकोसिस्टिम’ निर्माण करणे आवश्यक

उच्च न्यायालयाचे अधिवक्ता ॲड. संजीव पुनाळेकर म्हणाले, साम्यवादी स्वत:ला विचारवंत असल्याचा प्रसार करून जनतेमध्ये खोटे भ्रम पसरवत आहेत. यामुळे जनतेची चांगले आणि वाईट यांविषयी निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. या अपप्रचाराद्वारे हे नकली हिरो निर्माण करतात आणि देशाच्या खर्‍या नायकांना ‘खलनायक’ करण्याचे यांचे कारस्थान आहे. निखिल वागले, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी आदी यांचे प्रमुख आहेत. काही स्वयंसेवी संस्था यासाठी साम्यवाद्यांना पैसा पुरवत आहेत. यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टी, काही पत्रकार, पोलीस यांचाही सहभाग आहे. खोट आणि रेटून बोलून ही मंडळी  न्यायव्यवस्थेवर दबाव निर्माण करतात. यासाठी हिंदूंनीही स्वत:ची ‘इकोसिस्टिम’ निर्माण करणे आवश्यक आहे. हिंदुत्वनिष्ठ पत्रकार, अधिवक्ता, राज्यकर्ते यांनी या हिंदूविरोधी षड्यंत्राच्या विरोधात एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. साम्यवादी ‘वॉट्सअप युनिवर्सिटी’ नावाने ओरड करतात; मात्र ‘फेक नेरेटिव्ह’द्वारे हेच प्रसिद्धीमाध्यमांचा उपयोग करून समाजामध्ये खोटी माहिती पसरवत आहेत. याविषयी जनतेने सावध रहाण्याची आवश्यकता आहे.

प्रख्यात सर्जन आणि लेखक डॉ. अमित थडानी म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला ११ वर्षे पूर्ण झाली; मात्र इतक्या वर्षामध्ये हा खटला पूर्णपणे खोट्या पद्धतीने चालवला गेला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमध्ये आर्थिक घोटाळा,  काहीजणांशी असलेले पूर्ववैमनस्य किंवा त्यांच्यावर यापूर्वी झालेले आक्रमण अशी विविध अंगे होती; मात्र अन्वेषण केवळ एकाच कोनातून करण्यात आले. हिंदुत्वनिष्ठ संघटनांना आरोपी करण्यासाठीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे अन्वेषण करण्यात आले. हिंदुत्वनिष्ठ संघटनांची अपकीर्ती करण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येची ट्रायल चालवली गेली. अन्वेषण यंत्रणांनी आरोपींच्या विरोधात खोटे पुरावे सादर केले. याविषयी मी दाभोलकर-पानसरे हत्या ‘तपासामागील रहस्ये ?’ हे पुस्तक लिहिले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.