राज्यात शनिवार, १९ जूनपासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केला असून त्याप्रमाणे शनिवार, १९ जूनपासून ३० ते ४४ या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. या वयोगटातील नागरिकांना मोफत लस मिळणार आहे.
(हेही वाचा : मुंबईत रुग्णसंख्या वाढता वाढता वाढे)
कोविन ऍपमध्ये होणार बदल!
शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ही ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील करता येणार आहे. ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचे नियोजन करण्याकरिता कोविन ऍपमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकिस्तक, जिल्हा आरोग्यधिकारी यांना त्याबाबत पत्र पाठविले असून संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
Join Our WhatsApp Community