MIM करणार मविआमध्ये प्रवेश? कोणाला होणार फायदा आणि कोणाला तोटा?

130

लोकसभेनंतर राज्यात आता विधानसभेचे वारे वाहत आहे. आगामी विधानसभाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. यावेळी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्य लढत दिसणार आहे. कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघात उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे MIM चे असदुद्दीन ओवेसी आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात सर्व राजकीय समीकरण बदलणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे.

एमआयएमचे (MIM) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला एकत्र येण्याचे आवाहन केल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे जर विधानसभा निवडणुकीत एमआयएम आणि महाविकास आघाडी एकत्र आले, तर राज्याचे समीकरण पूर्णपणे बदलणार हे मात्र निश्चित आहे.

(हेही वाचा Badlapur School Case : … तर आम्ही कारवाई करण्यास मागेपुढे पहाणार नाही; उच्च न्यायालयाने खडसावले)

काही प्रमाणात फायदा तर काही प्रमाणात नुकसान

जर एमआयएम (MIM) महाविकास आघाडीमध्ये सामील झाले, तर काँग्रेस आणि शरद पवार गटाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे, तर ठाकरे गटाला याचा काही प्रमाणात फायदा तर काही प्रमाणात नुकसान देखील होऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. एमआयएमचा महाविकास आघाडीमध्ये सामिल होण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अल्पसंख्याक मतांचे विभाजन होणार नाही आणि याचा थेट फायदा काँग्रेस आणि शरद पवार गटाला होणार.

ठाकरे गटाला मात्र नुकसानच होईल 

तर दुसरीकडे हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या ठाकरे गटाला याचे नुकसान होऊ शकते. भाजपा, शिंदे गट हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटावर निशाणा साधून ठाकरेंच्या व्होट बँकेला तडा देऊ शकतो. राजकीय पंडितानुसार एमआयएम (MIM) जर महाविकास आघाडीमध्ये सामील झाले तर याचा मोठा फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे एमआयएम (MIM) प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना, भाजपाने देशाचे नुकसान केले आहे. त्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारे भाजपाला सत्तेतून दूर करायचे आहे, असे म्हटले आहे. याच बरोबर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी युती होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. माहितीनुसार, राज्यात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.