कोण आला रे कोण आला…शिवसेनेचा वाघ आला…गेली ५५ वर्षे ही घोषणा शिवसैनिकांच्या कानी पडते आणि त्याचे रक्त आजही सळसळते…शिवसेना आणि शिवसैनिकांचे नाते अतूट आहे…आता हिच शिवसैनिकांची आणि मराठी माणसाची शिवसेना ५५ वर्षांची होत आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेच्या वर्धापन दिनावर कोरोनाचे सावट आहे. यंदाही वर्धापन दिन साधेपणाने साजरा होत आहे, पण शिवसैनिकाचा उत्साह आजही कायम आहे. याच शिवसैनिकांच्या शिवसेनेचा आढावा घेणार हा खास रिपोर्ट!
१९ जून १९६६…हा काळ होता मराठी माणसाच्या न्यायहक्काचा…आणि हेच ओळखून मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी जन्म झाला शिवसेना या संघटनेचा. बाळासाहेब ठाकरे यांच्या या शिवसेनेने मराठी माणसाच्या हक्कासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला अन् सुरु झाला मराठी माणसाचा न्याय हक्काचा लढा…साहेब देतील तो आदेश असे म्हणत मराठी तरूण हा साहेबांसाठी आणि त्यांच्या शिवसेनेसाठी रस्त्यावर दिसू लागला अन् हळहळू बाळासाहेबांच्या संघटनेचे रुपांतर झाले एका राजकीय पक्षात.
८० टक्के समाजकारण अन् २० टक्के राजकारण
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी तयार झालेल्या या संघटनेचे रुपांतर हळूहळू राजकीय पक्षात झाले, पण ८० टक्के समाजकारण अन् २० टक्केच राजकारण या बाळासाहेबांच्या वाक्याने मराठी तरुणांना भुरळ घातली. बाळासाहेबांची भाषणे ही तरुणांना दिवसेंदिवस भूरळ पाडू लागली. कट्टर हिंदुत्व अन् मराठी अस्मिता यामुळे शिवसेनेचा आलेख त्या काळी दिवसेंदिवस वाढतच गेला.
(हेही वाचा : शिवसेना-भाजपचं सूत जुळतंय… सलग दुसऱ्यांदा एकत्र!)
बाबरी प्रकरणानंतर शिवसेनेची लोकप्रियता वाढली
१९९२ मध्ये अयोध्येत बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आली. अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी याची जबाबदारी झटकली. मात्र शिवसेनेने ही जबाबदारी आपल्या अंगावर घेतली. होय! बाबरी माझ्या शिवसैनकांनी पाडली आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे!, असे सांगणारे बाळासाहेब ठाकरे हे देशातील एकमेव नेते होते. त्यानंतर खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे तरुण आकर्षित झाला.
अशी झाली शिवसेनेची राजकारणात पहिली एन्ट्री
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी अशी ओळख असलेल्या शिवसेनेची खरी राजकीय एन्ट्री ही १९६७ साली झाली. १९६७ मध्ये ठाणे नगरपालिकेची निवडणूक शिवसेनेने लढवली आणि शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष झाला. त्यानंतर शिवसेनेने १९७१मध्ये पहिली विधानसभेची निवडणूक लढवली, ज्यात शिवसेनेला अपयश आले. १९८९मध्ये शिवसेनेचा पहिला खासदार निवडून आला तर १९९०च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे पहिल्यांदाच ५२ आमदार निवडून आले होते. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या मुंबई महानगर पालिकेत शिवसेनेची इतकी वर्षे सत्ता आहे, त्या पालिकेवर शिवसेनेचा पहिला महापौर १९७१ साली विराजमान झाला. डॉ. हेमचंद्र गुप्ते हे शिवसेनेचे पहिले महापौर झाले. मात्र त्यानंतर १९९६ पासून ते आतापर्यंत शिवसेनेचे महापौर मुंबईत आहेत.
शिवसेनेचा भगवा विधानभवनावर फडकला
१९९५ साली पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानभवनावर शिवसेनेचा भगवा फडकला आणि मनोहर जोशी यांच्या रुपाने शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री राज्याला मिळाला. त्यानंतर नारायण राणे हे आठ महिन्यांसाठी मुख्यमंत्री झाले. मात्र त्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हायला बराच काळ गेला. आता ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती राज्याचा काराभार सांभाळत असून, उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार करत आहेत.
(हेही वाचा : लसीकरण केंद्र उभारणीत शिवसेना-भाजप नगरसेवकच आघाडीवर!)
अनेकांनी सोडली साथ
शिवसेनेला या ५५ वर्षांत बरेच राजकीय हादरे बसले. छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी शिवसेनेची साथ सोडली. तर याच काळात बाळासाहेबांचे घरही फुटले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या काकांच्या पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचे खास होते. त्यांनी पक्ष सोडताना माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं, असे म्हणत शिवसेनेची साथ सोडली अन् मनसेची स्थापना केली.
सत्ता आली पण मित्र गमावला
शिवसेना- भाजपा ही गेल्या अनेक वर्षांचे अतुट नाते..हिंदुत्वाच्या मुद्यावर हे दोन्ही पक्ष एकत्र आले खरे पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षाची २५ वर्षांची युती पहिल्यांदा तुटली..निवडणुकीच्या निकालानंतर हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले, पण मुख्यमंत्री भाजपचा बसला. मात्र आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने मात्र आपला हा जुना मित्र कायमचा गमावला. आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, पण त्यांच्यासोबत त्यांचा जुना मित्र नाही. ज्यांच्याविरोधात गेली अनेक वर्षे शिवसेना लढत होती, त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीने आज राज्याच्या मुख्यमंत्री पदी उद्धव ठाकरे विराजमान झालेत.
(हेही वाचा : अखेर ‘त्या’ विमानतळाला शिवसेनाप्रमुखांचे नाव!)
Join Our WhatsApp Community