पूर्वीचा रेणापूर मतदारसंघ आता परळी झाला. १९९७ पासून आतापर्यंत सात वेळा या मतदारसंघात भाजपाचा उमेदवार विजयी झाला. त्यात पाच वेळा स्वत: गोपीनाथ मुंडे, दोनदा त्यांची मुलगी पंकजा मुंडे यांनी येथे कमळ फुलवलं. गेल्यावेळी पंकजा मुंडे यांचा ३५ हजार मतांनी पराभव करत, राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे विजयी झाले. यंदाही धनंजय मुंडेंनाच येथून लढायचं आहे. मात्र यावेळी स्थिती जरा बदलली आहे. धनंजय मुंडे व पंकजा मुंडे एकत्र असूनही, शरद पवारांचं येथे जरा विशेष लक्ष आहे. (Maharashtra Politics)
राष्ट्रवादीच्या फुटीत धनंजय मुंडे हे अजित पवारांसोबत गेल्यामुळे शरद पवारांना या मतदारसंघात बदल करायचाय. या मतदारसंघात धनंजय मुंडेंचा पराभव करण्यासाठी शरद पवार नक्कीच डाव टाकतील, असे दिसत आहे. महायुतीत ही जागा धनंजय मुंडे म्हणजे अजित पवार गटासाठी सोडली जाण्याची शक्यता सर्वाधिक आहे. भाजपाच्या पंकजा मुंडे सोबत असल्याने येथे धनंजय मुंडे यांचेच पारडे सध्या जड आहे. धनंजय मुंडे यांच्या उमेदवारीविरोधात महायुतीकडून इतर कुणीही स्पर्धक सध्यातरी नाही. (Maharashtra Politics)
(हेही वाचा – महाराष्ट्र बंद मागे घ्यावा; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर Sharad Pawar यांचे मविआला आवाहन)
धनंजय मुंडेंना कोण देणार फाईट?
काँग्रेसकडून राजेसाहेब देशमुख, शरद पवार गटाकडून सुदामती गुट्टे, अॅड. माधव जाधव, राजेभाऊ फड, बबन गित्ते हे येथून इच्छुक आहेत. मात्र तरीही धनंजय मुंडे यांचे प्राबल्य पाहता त्यांच्या तोडीस तोड फाईट देणारा नेता नसल्याचे परळीतील स्थानिकांच्या बोलण्यावरुन समजते. (Maharashtra Politics)
जरांगे फॅक्टरचा बसणार फटका ?
लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात मराठा-ओबीसी वादाचा मुद्दा प्रकर्षाने जाणवला. परळीत विधानसभा निवडणुकीतही हा मुद्दा नक्कीच जाणवेल. मनोज जरांगे कुणामागे ताकद उभी करतात, ते पहावे लागेल. शिवाय मुंडेंच्या विरोधात मराठा- मुस्लिम व दलित मतांचे विभाजन करणारा नेता शोधण्याचे काम शरद पवार करु शकतात अशीही शक्यता आहे.
या मतदारसंघात मराठा समाजाने एक गठ्ठा मतदान दिले तर लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र धनंजय मुंडेंच्या परळीत असा बदल होण्याची शक्यता कमीच वाटते. कारण लोकसभेला याच मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना ७४,८३४ मतांची आघाडी मिळाली होती. (Maharashtra Politics)
(हेही वाचा – Jammu-Kashmir Assembly Elections : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट लढवणार ‘इतक्या’ जागा)
विकासकामांच्या मुद्द्यांवर लढली जाईल निवडणूक
धनंजय मुंडे यांच्या काळात पाणी, रस्ते आणि मंदीरे यांचे प्रश्न मार्गी लागल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. परळी शहरापेक्षा परळी तालुक्यातील ग्रामीण भागातील जनता मुंडे घराण्याच्या मागे मोठ्या प्रमाणात दिसते. शहरात अंतर्गत गटारे, एसटी स्टॅन्ड, सरकारी रुग्णालयातील गैरसोय आदी प्रश्नांवर नाराजी जाणवते, असे असले तरी, मुंडे यांच्या कामावर बहुतांश जनता सध्यातरी समाधानी असल्याचे चित्र दिसते. त्यामुळे विकासकामांच्या जोरावर ही निवडणूक मुंडे यांना सोप्पी असल्याचे म्हटले जात आहे. (Maharashtra Politics)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community