वीर सावरकरांवरील ‘त्या’ व्हायरल व्हिडिओमागील काय आहे सत्य? 

स्वातंत्र्यवीर सावरकर सेल्युलर कारागृहात असतानाच्या कालखंडावरील चित्रफित सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, त्यातील दृश्ये प्रेम वैद्य लिखित, दिग्दर्शित ‘वीर सावरकर’ या १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या लघुपटातील आहेत.

139

सध्या सोशल मीडियामध्ये वीर सावरकर अंदमानात शिक्षा भोगत असतानाचे चित्रीकरण केलेली व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष वीर सावरकरांचे चित्रीकरण केल्याचा दावा करण्यात आला आहे. वास्तव मात्र तसे नाही. ती व्हायरल होत असलेली क्लिप १९८३ साली प्रदर्शित झालेल्या ‘वीर सावरकर’ लघुपटाचा काही भाग आहे. वीर सावरकर यांच्या अंदमान पर्वासंबंधी चित्रीकरण केलेला भाग या लघुपटातून काढून घेऊन ही क्लिप तयार करण्यात आली आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले प्रेम वैद्य यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने यामागील वस्तुस्थिती समोर आणली आहे.

१९८३ साली केला होता ‘तो’ लघुपट!

२८ मे १९८३ या दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मशताब्दीच्या विशेष दिनानिमित्ताने फिल्म्स डिव्हिजनच्या वतीने ‘वीर सावरकर’ हा लघुपट तयार करण्यात आला होता. देशभर १४ भाषांत तसंच दूरदर्शनवरून हा लघुपट प्रदर्शित झाला होता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले प्रेम वैद्य यांनी या चित्रपटाचे चित्रीकरण केले होते. अशा या लघुपटातील अंदमान पर्वाचा भाग काढून त्यावर छोटी क्लिप बनवण्यात आली. त्यामध्ये त्या काळी वीर सावरकर यांचे अंदमानात जाऊन प्रत्यक्ष चित्रीकरण केल्याचा दावा करण्यात आला आहे. हे दावा साफ खोटा आहे, हे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने पुराव्यानिशी उघड केले आहे.

(हेही वाचा : माझी जन्मठेप मधील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आजही प्रेरणादायक)

असा आहे ‘वीर सावरकर’ लघुपटाचा निर्मितीप्रवास! 

 तीन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर पूर्ण झाला शोधनिबंध! 

४१ मिनिटांच्या या लघुपटात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ८३ वर्षांच्या आयुष्याचा अतिशय प्रभावी आलेख मांडण्यात आला असून भगूर, नाशिक, रत्नागिरी, शिरगाव, अंदमान अशा ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष चित्रीकरण करण्यात आले  आहे. खरंतर १९ नोव्हेंबर १९७७ या दिवशी हा लघुपट तयार करण्याची जबाबदारी मुकुंद माधव अर्थात प्रेम वैद्य यांच्यावर सोपवण्यात आली होती. १९७४ मध्ये अंदमान निकोबारमधील आदिवासींवरील लघुपटाच्या चित्रीकरणासाठी गेले असताना सेल्युलर कारागृहाचे काराधीप गोविंदराव हर्षे यांच्यासमवेत त्यांनी सावरकरांच्या कोठडीत जाऊन सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला होता. त्या स्थानाचं महात्म्य असं की एरवी गद्य लेखन करणाऱ्या प्रेम वैद्य यांना त्या भारावलेल्या क्षणी काव्य स्फुरलं, जे अंदमान नभोवाणीवर सादरही झालं. तरीसुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची फारशी माहिती नसल्यामुळे प्रेम वैद्य यांनी सावरकर साहित्य वाचनाला सुरुवात केली. सावरकरांचे चरित्रकार धनंजय कीर, सुधीर फडके, प्रभाकर पेंढारकर, सावरकरांचे सचिव बाळाराव सावरकर, पंडित बखले अशा अनेकांच्या त्यांनी भेटी घेतल्या. तीन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर १७ फेब्रुवारी १९७८ वैद्य यांचा शोधनिबंध पुरा झाला. तो वाचून त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना आठ दिवसात पटकथा लिहिण्यास सांगितलं आणि सावरकर जयंतीच्या पूर्व संध्येला, २७ मे १९७८ ला प्रेम वैद्य यांची सत्याहत्तर पानी पटकथा लिहून तयार झाली. परंतु त्यानंतर इतर दोन-तीन लघुपटांच्या कामात ते व्यग्र झाले आणि ऑक्टोबर १९७८ मध्ये फिल्म्स डिव्हिजननं त्यांना ३६ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी लंडनला पाठवलं. सावरकरमय झालेल्या वैद्य यांच्यासाठी ही पर्वणीच होती. कारण लंडनमधील वास्तव्य ही सावरकरांच्या आयुष्यातील अतिशय महत्वाची वादळी वर्ष होती. वैद्य यांनी आपलं प्रशिक्षण सांभाळून ‘दर्यापार’ या पुस्तकाचे लेखक मुकुंद सोनपाटकी यांच्या समवेत भारत भवन, ग्रेज इन, ब्रिटीश म्युझियम, कॅक्स्टन हॉल, ब्रिक्स्टन कारागृह, पेंटनव्हील कारागृह अशी अनेक ठिकाणं पाहिली. त्यानंतर प्रत्येक शनिवार, रविवार ते भारत भवनाचं बाहेरून दर्शन घेऊ लागले. भारत भवनात राहणारे भाडेकरू जॉन क्लॅरिज यांना विनंती केल्यावर वैद्य यांना भारत भवनाचं आतून दर्शन घेता आलं आणि तिथली छायाचित्रदेखील घेता आली.  लंडनपासून जवळच असलेल्या ज्या ब्रायटनच्या किनाऱ्यावर वीर सावरकरांना ‘ने मजसी ने परत मातृभूमीला हे अजरामर काव्य स्फुरलं, त्या सागरकिनारी वैद्य यांनी बराच काळ व्यतीत केला. तिथल्या कोलीनडेल इथल्या ब्रिटीश म्युझियम न्यूजपेपर लायब्ररीप्रमाणेच इतर अनेक ठिकाणांहून त्यांनी वेगवेगळी कागदपत्रं मिळवली.

(हेही वाचा : ‘द वीक’ची शरणागती! म्हणाले, वीर सावरकर ‘सर्वश्रेष्ठ’!)

…आणि पुन्हा जोमाने चित्रीकरण सुरु झाले! 

पटकथा तयार होती. अनेक छायाचित्र, कागदपत्रांची जमवाजमव झाली होती. अगदी नाशिकमधील जॅक्सनचं थडगं सुद्धा शोधण्यात आलं. आता प्रत्यक्ष चित्रीकरण तेवढं बाकी होतं. जनता पार्टीच्या राजवटीत वीर सावरकर लघुपटाच्या कामाला सुरुवात झाली पण जनता राजवट संपली आणि लघुपटाचं काम थांबवण्याचा आदेश प्रेम वैद्य यांच्या हाती आला. अतिशय संवेदनशील मनाच्या वैद्य यांना हा आघात सहन झाला नाही आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. दोन महिने त्यांना रुग्णालयात काढावे लागले. तब्येत सुधारल्यावर ते कामावर जाऊ लागले पण मनावर आलेले नैराश्याचे ढग काही मावळत नव्हते आणि १५ ऑगस्ट १९८२ ला अचानक त्यांना लघुपटाचं काम सुरु करण्याचा आदेश मिळाला. दिल्लीला गेलेले प्रभाकर पेंढारकर, तत्कालीन नभोवाणी मंत्री वसंत साठे यांचा तसा निरोप घेऊन आले होते. प्रेम वैद्य यांनी पुन्हा नव्या जोमानं लघुपटाच्या कामाला सुरुवात केली. ६ ऑक्टोबर १९८२ हा चित्रीकरणासाठी निघण्याचा दिवससुद्धा निश्चित करण्यात आला होता पण सावरकरांची भूमिका कोण करणार हे ठरलं नव्हतं. खरंतर सावरकरांच्या भूमिकेसाठी वैद्य यांनी ‘सागरा प्राण तळमळला’ या नाटकात सावरकरांची भूमिका केलेले प्रसिध्द रंगकर्मी माधव खाडिलकर यांचं नाव निश्चित केलं होतं. माधवराव त्यावेळी बँकेत नोकरी करत होते. त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना काही अटी घातल्या होत्या पण प्रत्यक्ष प्रेम वैद्य यांची भेट झाल्यावर मात्र खाडिलकरांच्या वरिष्ठांनी त्यांना लघुपटात काम करण्यास लगेचच संमती दिली. पण ते होणे नव्हते. बाकी अतिशय उत्तम जमलेल्या त्या लघुपटात माधवराव खाडिलकर असते तर तो अधिक परिणामकारक वठला असता हे मात्र निश्चित.

वीर सावरकरांचा संपूर्ण जीवनप्रवास मांडला!

अर्थात तेव्हा नेमके काय घडले ते कळायला आता काही मार्ग नाही. कोणी कलाकार मिळेना म्हणून सावली दाखवून काम निभावून नेण्याचं ठरवण्यात आलं.  पण तेवढ्यात त्यांच्याच युनिटमध्ये काम करणाऱ्या कसबे यांचा चेहरा सावरकरांच्या चेहऱ्याशी मिळताजुळता वाटल्यामुळे त्यांनीच ही भूमिका करावी असं ठरवण्यात आलं. बाल विनायकाची भूमिका केली ती जयशंकर शहाणे यानं तर पुण्याच्या महाविद्यालयीन जीवनातल्या सावरकरांची भूमिका रविंद्र मुळे यांनी केली. रत्नागिरीतील स्थानबद्धतेदरम्यान सावरकरांचा मुक्काम शिरगाव इथल्या विष्णुपंत दामले यांच्या घरी होता. आपल्या तेरा वर्षांच्या स्थानबद्धतेत सावरकरांनी अस्पृश्यता निर्मुलनाचं अफाट कार्य केलं. स्पृश्य, अस्पृश्यांनी एकत्र यावं यासाठी त्यांनी स्नेहभोजन, स्नेहपूजन, हळदीकुंकू असे समारंभ आयोजित केले. शिरगावात ज्या ठिकाणी हळदीकुंकू समारंभ झाले तिथंच हळदीकुंकू समारंभाचं चित्रिकरण करण्यात आलं. एखाद्या संशोधकाप्रमाणे प्रेम वैद्य यांनी स्टुटगार्ड इथं झालेल्या जागतिक समाजवादी परिषदेतील सरदारसिंग राणा आणि मादाम कामा यांचं छायाचित्र; ज्या मोरिया बोटीतून सावरकरांनी ब्रिटीशांच्या तावडीतून सुटण्याच्या प्रयत्न केला त्या बोटीचं मूळ छायाचित्र तसंच हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या जुन्या इमारतीचं छायाचित्र मिळवलं. हेग आंतरराष्ट्रीय अभियोगाच्या मूळ कागदपत्रांचा अभ्यास केला. वीर सावरकर लघुपटात लेखक, दिग्दर्शक प्रेम वैद्य यांनी अफाट मेहनतीनं मिळवलेल्या अशा साऱ्या खजिन्याचं दर्शन घडतं. लघुपटातील वीर सावरकरांची गीतं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केली आणि गायली आहेत. निर्माते ना. सी. थापा, कथा लेखक, दिग्दर्शक प्रेम वैद्य असलेल्या फिल्म डिव्हिजनच्या ‘वीर सावरकर’ या लघुपटाला एप्रिल १९८४ मध्ये फिल्मफेअर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. ताश्कंद चित्रपट महोत्सवात हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला.

(हेही वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे राष्ट्र सुरक्षेचे पिताच- उदय माहुरकर)

प्रेम वैद्य यांचा परिचय!

  • १९५४ मध्ये फिल्म्स डिव्हिजनमध्ये रुजू झालेले प्रेम वैद्य, ३१ वर्षांच्या कारकीर्दीनंतर १९८५ मध्ये निवृत्त झाले.
  • १९६५ मधील भारत पाकिस्तान युद्ध, पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा ताश्कंद दौरा, १९७१ मधील बांगलादेश मुक्ती, एडमंड हिलरी यांची भारत-न्यूझीलंड जेट बोट मोहिम, आशियाई स्पर्धा अशा अनेक महत्वाच्या घटनांचं चित्रीकरण वैद्य यांनी केलं होतं.
  • अंदमान निकोबारमधील आदिवासींच्या जीवनावरील ‘मॅन इन सर्च ऑफ  मॅन’, ‘अगेन्स्ट द करंट’ या एडमंड हिलरी यांच्या सागर ते आकाश मोहिमेवरील लघुपटांसाठी त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
  • मेमोरेबल असाईनमेंटस् इन मुव्हिंग इमेजेस आणि सावरकर अ लाइफलॉंग क्रुसेडर ही त्यांची पुस्तकं प्रसिध्द आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.