एका रिक्षाचालकासह प्रेमाचे नाटक करून त्याच्या मदतीने पतीची हत्या करून मृतदेह एका निर्जन ठिकाणी फेकल्याची घटना डोंबिवली शहरात नुकतीच उघडकीस आली आहे. ठाणे गुन्हे शाखा कक्ष ३च्या पथकाने या हत्येची उकल करून पत्नीसह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. डोंबिवली (पूर्व) मानपाडा येथे राहणारा प्रवीण धनराज पाटील (३०) हा बेपत्ता झाल्यामुळे पत्नी लक्ष्मी हिने मानपाडा पोलिस ठाण्यात ४ जून रोजी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. एका औषध कंपनीत कामाला असणारा प्रवीण पाटील हा अचानक बेपत्ता झाल्यामुळे परिसरात प्रवीण पाटील यांची पत्नी लक्ष्मी हिच्याबाबत चित्रविचित्र चर्चा सुरू होती. पती बेपत्ता होऊनही लक्ष्मी ही बिनधास्त होती. याची कुणकुण ठाणे गुन्हे शाखा घटक ३ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव जॉन यांच्या पथकाच्या कानावर आली. पाटील यांच्या बेपत्ता होण्यामागे पत्नीचा काही संबंध आहे का, या संशयावरून गुन्हे शाखेने तपास सुरू केला.
लक्ष्मीचे रिक्षा चालकासोबत होते प्रेमप्रकरण!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली पो.निरीक्षक विलास पाटील, सपोनि भूषण दायमा, पोउपनिरी नितीन मुदमून, मोहन कलमकर, शरद पंजे, दत्ताराम भोसले, राजेंद्र घोलप, राजेंद्र खिलारे, अजितसिंग राजपूत, सचिन साळवी, सचिन वानखडे, गुरुनाथ जरग, प्रकाश पाटील, हरिश्चंद्र बंगारा, नरेश जोगमार्गे, विलास मालशेटे, ज्योतीराम साळुंके, विश्वास चव्हाण, मिथुन राठोड, मपोना चित्रा इरपाचे, स्वाती रहाणे या पथकाने तपास सुरू केला. लक्ष्मी पाटील हिला एक चार वर्षांची मुलगी असून ती मागील वर्षाभरापासून डोंबिवलीत प्रवासी रिक्षा चालवते, अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली. पोलिसाच्या तांत्रिक तपासावरून लक्ष्मी हिचे एका रिक्षा चालकासोबत मागील काही महिन्यांपासून प्रेमप्रकरण सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
(हेही वाचा :वैभव नाईकांना ‘शिवप्रसाद’ दिलाय, ‘सामना’त येऊन देतो! नितेश राणेंचा इशारा )
कपड्यावरून मृतदेहाची ओळख पटली!
पोलिस पथकाने लक्ष्मीचा प्रियकर अरविंद उर्फ मारी राम आणि त्याचा सहकारी सनी सागर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघांपैकी सनी सागर याने सर्वात अगोदर गुन्ह्याची कबुली दिली. लक्ष्मी आणि आम्ही दोघांनी मिळून प्रवीण पाटील यांची २ जून रोजी हत्या करून मृतदेह बदलापूर कर्जत रोडवरील एका निर्जन ठिकाणी फेकला असल्याचे संगीतले. गुन्हे शाखेने लक्ष्मी पाटील ला चौकशी ताब्यात घेऊन मृतदेह फेकलेल्या ठिकाणी दाखल झाले. मात्र नेरळ पोलिसांनी हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत अगोदरच ताब्यात घेऊन अपमृत्यूची नोंद केली होती. गुन्हे शाखेने नेरळ पोलिसांना मृतदेहावर मिळून आलेल्या कपड्यावरून हा मृतदेह प्रवीण पाटील याचा असल्याचे ओळख पटली. लक्ष्मी हीची वर्तवणूक काही चांगली नव्हती, पती हा तिच्यावर नेहमी संशय घेत होता, त्यातून दोघांचे भांडण होत असे, पतीला कायमचे संपणवण्यासाठी लक्ष्मीने २ महिन्यांपूर्वीच एका रिक्षा चालकाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याचा वापर पतीच्या हत्येसाठी केला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून लक्ष्मी पाटीलसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community