राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेचा दुसरा वर्धापन दिन साजरा केला. या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या भाषणात उध्दव ठाकरे यांनी मनोहर जोशी, सुभाष देसाई, दिवाकर रावते आणि त्यानंतर लिलाधर डाके या जुन्या शिवसैनिकांचा उल्लेख केला. परंतु बाळासाहेबांच्या अष्टप्रधान मंडळातील एक सदस्य आणि उध्दव ठाकरे यांनी नामोल्लेख केलेल्या व्यक्तींचे सहकारी असलेल्या, शिवसेना नेते आणि माजी मंत्री सुधीर जोशी यांचा त्यांना विसर पडला. शिवसेनेच्या प्रत्येक वर्धापन दिनाच्या आणि दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सुधीर भाऊंची तिसरी, चौथी खुर्ची असायची. परंतु सध्या त्यांची प्रकृती ठीक नसल्याने, ते ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाहीत. परंतु इतरांच्या नावांचा उल्लेख करताना उध्दव ठाकरे यांना शिवसेनेच्या या शिलेदाराचा पुरता विसर पडल्याचे या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात दिसून आले.
मुख्यमंत्रीपदाचे पहिले उमेदवार
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अष्टप्रधान मंडळातील एक सदस्य असलेले सुधीरभाऊ जोशी हे सध्या प्रकृतीमुळे सक्रीय राजकारणात नाहीत. शिवसेनेच्या जडणघडणीत सुधीर भाऊंचा मोठा वाटा आहे. युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाचे पहिले उमेदवार सुधीर भाऊ हेच होते. परंतु आयत्या वेळी त्यांचा पत्ता कापून मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. त्यामुळे सुधीर भाऊंकडे राज्याच्या शालेय मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या अष्टप्रधान मंडळातील माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, लिलाधर डाके, सुभाष देसाई आणि माजी मंत्री सुधीर जोाशी हे नेते राहिलेले आहेत.
(हेही वाचाः सरनाईकांच्या पत्रातून शिवसेनेतील अस्वस्थता उघड- दरेकर)
डोळ्याआडचे शिवसैनिक दिसेनात
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या प्रारंभीच ५५ वर्षांच्या वाटचालीचे श्रेय शिवसेना जोपासली त्या शिवसैनिकांना देऊन त्यांचे अभिवादन केले. त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी सुभाष देसाई, मनोहर जोशी, दिवाकर रावते यांच्या नावाचा उल्लेख केला, तसेच प्रमोद नवलकर यांचीही आठवण काढली. शिवसेनेचा वर्धापन दिन, बाळासाहेबांचा वाढदिवस आणि मार्मिकचा वर्धापन दिन हे शिवसैनिकांसाठी तीन सण असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु सर्वांच्या नावांचा उल्लेख करताना तसेच त्यांची आठवण काढताना, शिवसेना नेते सुधीर भाऊ जोशी यांची साधी आठवणही त्यांनी काढली नाही, त्यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे शिवसेनेला जे डोळयासमोर असतात, तेच आठवतात आणि डोळयाच्या आड असलेल्या आणि अडगळीत पडलेल्या ज्येष्ठ नेत्यांना शिवसेना आता सत्ता आल्यानंतर विसरू लागली असल्याचे यावरुन स्पष्ट होते.
(हेही वाचाः महापालिका निवडणूक जवळ येताच शिवसेनेला आठवला ‘मराठी’ माणूस)
Join Our WhatsApp Community