पुरावे जुळवण्यासाठी एनआयएने केली आरोपींची डीएनए चाचणी

पुराव्यांशी आरोपीचे डीएनए जुळल्यास हे या आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे असतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

146

अंटालिया स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणात अटक करण्यात आलेले चकमक फेम माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा आणि इतर ४ आरोपींचे रविवारी डीएनए नमुने घेण्यात आले आहेत. हे नमुने या प्रकरणात गोळा केलेल्या पुराव्यांशी जुळवण्यात येणार असल्याची माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिली आहे. पुराव्यांशी आरोपीचे डीएनए जुळल्यास हे या आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे असतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुरावे जुळवून करणार तपास

अंटालिया स्फोटके आणि मनसुख हत्या प्रकरणात एनआयएने दोन आठवड्यांपूर्वी तवेरा कार जप्त केली होती. या तवेरा कारच्या आतच मनसुखची हत्या करुन मृतदेह खाडीत फेकून देण्यात आला होता. या तवेरामध्ये सापडलेले पुरावे आणि इतर ठिकाणांहून गोळा केलेल्या पुराव्यांशी अटक करण्यात आलेले आरोपी प्रदीप शर्मा आणि इतर चार आरोपींचे डीएनए जुळवून तपास करण्यात येणार आहे.

(हेही वाचाः प्रदीप शर्माला अखेर अटक! )

आरोपींना होऊ शकते मोठी शिक्षा

रविवारी पुण्याहून फॉरेन्सिकचे एक पथक एनआयए कार्यालायत दाखल झाले होते. त्यांनी प्रदीप शर्मा यांच्यासह इतर ४ आरोपींचे डीएनए नमुने घेतले आहेत. हे नमुने या दोन्ही प्रकरणांत सापडलेले पुरावे, डीएनएच्या पुराव्यांशी जुळल्यास आरोपींविरुद्ध हा भक्कम पुरावा ठरणार असून, त्यामुळे आरोपींना शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यास मदत होणार आहे. अंटालिया येथे स्फोटके पेरलेली स्कॉर्पिओ कार, व इतर ठिकाणी सापडलेल्या आलिशान मोटारी, तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएच्या हाती यापूर्वी अनेक तांत्रिक पुरावे लागलेले आहेत.

१० जणांना अटक

अंटालिया स्फोटक आणि मनसुख हिरेन प्रकरणांत एनआयएने सचिन वाझेसह पाच आजी-माजी पोलिस आणि इतर पाच अशी एकूण १० जणांना आतापर्यंत अटक केली आहे. दहा आरोपींपैकी पाच आरोपी हे न्यायालयीन कोठडीत असून, प्रदीप शर्मा यांच्यासह पाच जण सध्या एनआयए कोठडीत आहेत. त्यापैकी संतोष शेलार आणि आनंद जाधव या दोघांची आज कोठडी संपणार असून, त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

(हेही वाचाः मनसुखच्या मृत्यूनंतर ‘तो’ रिपोर्ट बनवणारे डॉक्टर आता एनआयएच्या रडारवर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.