-
ऋजुता लुकतुके
सलग १५ ग्रँडस्लॅम सामने जिंकून नवीन विक्रम रचणाऱ्या स्पेनच्या कार्लोस अल्काराझची सद्दी अखेर सोळाव्या सामन्यात मोडली. युएस ओपनच्या पहिल्याच फेरीत डच खेळाडू बोटिक फान दे शाल्सशुपने त्याला हरवलं, ते ही सरळ सेटमध्ये ६-१, ७-५ आणि ६-४ ने. या स्पर्धेत अल्काराझला विजयाचा प्रमुख दावेदार मानलं जात होतं. शिवाय सलग विजयांमुळेही त्याने फॉर्म दाखवून दिला होता. शिवाय बोटिकची आतापर्यंतची कामगिरी काही फारशी दखल घ्यावी अशी नव्हती. अशावेळी त्याने अल्काराझचा बळी घेऊन न्यूयॉर्क नगरीत अचानक खळबळ उडवून दिली. शुक्रवारी रात्री हा बोटिक शाम्सशुम कोण अशी चर्चाच रंगली होती. आणि पत्रकारांनी पत्रकार परिषदेत त्याला पहिला प्रश्न विचारला तो, ‘तुझं नाव कसं उच्चारायचं,’ हा! (US Open 2024)
(हेही वाचा- Avani Lekhara : पॅरालिम्पिकमध्ये ३ पदकं मिळवणारी पहिली नेमबाज अवनी लेखरा )
त्यानेही हसत हसत डच भाषेतील त्याच्या नावाचा उच्चार सांगितला. २०२२ मध्ये अल्काराझने युएस ओपन जिंकली होती. तर यंदा फ्रेंच आणि पाठोपाठ विम्बल्डन जिंकून त्याने दणका उडवून दिला होता. अशा अल्काराझला हरवणारा बोटिक कोण आहे, असा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडला आहे. (US Open 2024)
Botic was ready 🤚 pic.twitter.com/KlxepfNkgU
— US Open Tennis (@usopen) August 30, 2024
बोटिक हा नेदरलँड्सचा २८ वर्षीय खेळाडू आहे. या हंगामात त्याची कामगिरी ११-१८ अशी यथातथाच आहे. २०२४ च्या हंगामात तो सलग दोन सामनेही जिंकला नव्हता. आणि २०२१ च्या युएस ओपनमध्ये उपउपान्त्य फेरी त्याने गाठली होती, तीच आतापर्यंतची त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. आता याच स्पर्धेत पुन्हा एकदा त्याने सर्वोत्तम विजय साकारला आहे. एटीपी टूअरवरील तो एक नियमित खेळाडू आहे. आणि अलीकडच्या काळात काही चांगले विजयही त्याने मिळवले आहेत. बेसलाईनवरून चांगला खेळ करण्यात त्याची हातोटी आहे. आणि सर्व प्रकारच्या कोर्टवर तो लगेच जुळवून घेऊ शकतो. २०२१ मध्येही पात्रता स्पर्धेतून मुख्य स्पर्धेत येत त्याने अंतिम आठमध्ये स्थान मिळवलं होतं. (US Open 2024)
Botic van de Zandschulp just knocked Carlos Alcaraz out of the US Open! pic.twitter.com/QK3ZrkoPgx
— US Open Tennis (@usopen) August 30, 2024
२०२२ मध्ये बोटिकने जागतिक क्रमवारीत पहिल्यांदा पहिल्या तीसांत प्रवेश केला. एटीपी स्पर्धांमध्ये सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये तो नेहमीच प्रभावी कामगिरी करत आला आहे. त्याच्या भात्यात सर्व प्रकारचे फटके आहेत. आणि जोरकस सर्व्हिसही आहे. टेनिसमधील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याला नक्की स्थान मिळू शकेल, असा सर्वांगसुंदर खेळ त्याला लाभलाय. म्हणूनच हार्ड आणि क्ले अशा दोन्ही कोर्टवर तो प्रभावी ठरू शकतो. नेदरलँड्सच्या डेव्हिस चषक संघाचा तर तो नियमित आणि ज्येष्ठ खेळाडू आहे. २०२१ पासून त्याची कामगिरीही सातत्यपूर्ण आहे. (US Open 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community