बोगस लसीकरण प्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यात दुसरा आणि खार पोलिस ठाणे येथे तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी कांदिवली पोलिस ठाण्यात बोगस लसीकरण प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आलेली आहे. या पाच जणांनी मुंबईत ९ ठिकाणी लसीकरण मोहीम राबवली होती, त्यापैकी दोन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
या पाच जणांना अटक करण्यात आली!
कांदिवली पश्चिम एस.व्ही रोड येथील हिरानंदानी क्लब या ठिकाणी ३० मे रोजी लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती. या ठिकाणी प्रत्येकी १,२६० रुपये घेऊन ३९० जणांचे लसीकरण करण्यात आले होते. या लसीकरणाबाबत संशय येताच काही रहिवाश्यांनी कांदिवली पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून लसीकरण मोहिमेचे आयोजक महेंद्र सिंह, चंदन सिंह, नितीन मोडे, राजेश पांडे आणि करीम अकबर अली या पाच जणांना अटक करण्यात आली होती. या पाच जणांनी महानगरपालिकेला कुठलीही सूचना न देता तसेच परवानगी न घेता ही मोहीम राबवली होती, तसेच पॅकबंद नसलेल्या इंजेक्शन बॉटलमधून या लसी देण्यात आलेल्या होत्या, तसेच लाभार्त्यांना प्राप्त झालेले प्रमाणपत्र बोगस असल्याचे तपासात उघडकीस आले होते.
(हेही वाचा : अशी ‘पत्रं’ जी महाविकास आघाडीसाठी ठरली ‘विस्फोटक’!)
बोगस प्रमाणपत्र दिले!
या टोळीने मुंबईत ९ ठिकाणी बोगस लसीकरण मोहीम राबवली होती. त्यापैकी वर्सोवा येथे एक बोगस लसीकरण करण्यात आल्याचे रविवारी उघडकीस आले असून या ठिकाणी १५० जणांना लस देण्यात आली होती, त्यापैकी केवळ १५ ते २० जणांना कोविन अँपवरून प्रमाणपत्र आले असून ते देखील बोगस असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यात या पाच जणांविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
२०६ जणांना दिली बोगस लस!
खार पोलीस ठाणे येथे बोगस लसीकरणाचा तिसरा गुन्हा दाखल झाला. यातील आरोपी राजेश पांडे व संजय गुप्ता व इतर चारजणांनी आपापसात संगनमत करून कोकिलाबेन हॉस्पिटलतर्फे कोविड व्हॅक्सिनेशन कॅम्प आयोजित करीत असल्याची खोटी माहिती सांगून, फिर्यादी हे काम करीत असलेल्या टिप्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या स्टाफ व त्यांच्या कुटुंबीयांकरिता व्हॅक्सिनेशन कॅम्प आयोजित केला. एकूण २०६ लोकांना कोविशील्ड व्हॅक्सिनच्या नावाखाली काहीतरी भेसळयुक्त द्रव पदार्थ हा वॅक्सिन म्हणून दिला. त्यांच्या जीवितास धोका निर्माण केला. तसेच त्याचा मोबदला म्हणून त्यांच्याकडून एकूण २,८४,६९६/- इतकी रक्कम फसवणूक करून घेतली. या प्रकरणी पोलिसांनी गु.र.क ५२०/२१ भा.द. वि.क. ४२०,२६८,२७०,२७४,२७५,२७६,१८८,३४ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
Join Our WhatsApp Community