स्वबळाची भाषा करणारे नाना नरमले

आधी स्वबळाची भाषा आणि आता थेट महाविकास आघाडी भक्कम असल्याचे म्हणत नानांनी आपला सूर बदलल्याचे पहायला मिळत आहे.

137

२०२४ ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार अशी वारंवार भाषा करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भाषा नरमल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेना आमदार प्रताप सरसनाईक यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्यातील महाविकास आघाडी संकटात असल्याची चर्चा सुरू असताना राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे सरकार भक्कम आहे. सरकारच्या कामगिरीवर जनताही समाधानी आहे, परंतु सत्ता नसल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेला भाजप सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरुन राज्यातील मविआ सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका नाना पटोले यांनी भाजपवर केली. त्यामुळे आधी स्वबळाची भाषा आणि आता थेट महाविकास आघाडी भक्कम असल्याचे म्हणत नानांनी आपला सूर बदलल्याचे पहायला मिळत आहे.

सरकार पाच वर्षे चालेल

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रातूनही त्यांना केंद्रीय तपास यंत्रणा कसा त्रास देत आहेत, हे स्पष्ट होत आहे. राज्यातील मविआ सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे आतार्यंतचे सर्व प्रयत्न फेल गेले असून, आताही त्यांचा हा कुटील डाव यशस्वी होणार नाही. सरकार पाच वर्षे चालेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

(हेही वाचाः शिवसेनेत लेटरबॉम्ब, पवारांची दिल्लीत खलबते)

काय म्हणाले नाना पटोले?

भाजप केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून सुरुवातीपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीला त्रास देत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरुन भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात वाढला. त्याच शिवसेनेला भाजप आता त्रास देत आहे, हा भाजपचा कृतघ्नपणा आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे भाजपला पहावत नसून, त्यांची खुर्ची ओढण्याचा प्रयत्न ते करत आहेत. राज्यात मविआ सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचे नेते सरकार अस्थिर करण्यासाठी आटापिटा करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा या फक्त विरोधी पक्षांच्या लोकांवरच कारवाई करत आहेत. दिल्लीतील राजकीय बॉसच्या इशाऱ्याने विरोधकांवर दबाव आणण्याचे काम ते करत आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांना दिल्या जात असलेल्या त्रासाला पत्रातून वाचा फोडली आहे. ईडीच्या माध्यमातून विरोधकांना कसा त्रास दिला जातो हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व किरीट सोमय्या यांच्या बोलण्यातून वारंवार उघड झाले आहे.

भाजपचे दिवास्वप्न स्वप्नच राहणार

महाराष्ट्रातील सत्तेपासून वंचित राहिल्याने भाजप मागील दीड वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम पद्धतशिरपणे करत आहे. विरोधी पक्षाचे सरकार अस्थिर करण्याचे, विरोधांचा आवाज दाबण्याचे प्रकार सुरू आहेत. परंतु या दबाव तंत्रामुळे भाजपचे सत्तेचे दिवास्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, कोणत्याही दबावाला हे सरकार बळी पडणार नाही, असेही पटोले म्हणाले.
पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, २०२४च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची युती होणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. भारतीय जनता पक्षाविरोधात कोणतीही आघाडी उभी करायची असेल तर ती काँग्रेस पक्षाशिवाय होणे शक्य नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः अशी ‘पत्रं’ जी महाविकास आघाडीसाठी ठरली ‘विस्फोटक’!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.