राज्यात बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Majhi Ladki Bahin) जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या योजनेच्या अंतर्गत अर्ज केलेल्या महिलांना सलग दोन महिन्यांचे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे ३ हजार रुपये खात्यात जमा झाले. सरकारने अर्ज करण्याची मुदत वाढवून ती ३० सप्टेंबर केली आहे. मात्र या महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्यांचे ३ हजार रुपये मिळणार नसल्याचे महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.
आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे. ३१ ऑगस्ट ही नोंदणीची शेवटची तारीख नाही. यापुढेही अर्ज करता येणार आहेत. सरकारने १ जुलैपासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Majhi Ladki Bahin) लागू केली. या योजनेसाठी राज्यभरातून २ कोटी ४० लाख महिलांचे अर्ज आले. या योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता सरकारने ऑगस्टमध्ये जमा केला. त्यामुळे लाभार्थी महिलांना एकत्रित ३ हजार रुपये मिळाले. ज्या महिलांनी ३१ ऑगस्टपूर्वी अर्ज केले नाहीत, त्यांना मात्र ३००० रुपयांना मुकावे लागणार आहे. यापुढे अर्ज करणाऱ्या महिलांना त्या महिन्यापासूनच पैसे मिळणार आहेत. सरकारने १७ ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरूवात केली असून, आतापर्यंत दीड कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याने पैसे जमा झालेले नाही. आधार लिंक झाल्यानंतर पैसे जमा केले जाणार आहेत.
Join Our WhatsApp Community