मुंबईत एका दिवसात ‘लक्ष’ लसीकरणाचे ‘लक्ष्य’ पूर्ण

आजवरच्या विक्रमी लसीकरणानंतर सोमवारी २१ जून रोजी आजवरच्या तुलनेत सर्वात विक्रमी लसीकरण पार पडले.

122

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिवसाला एक लाख(लक्ष) लसीकरणाचे लक्ष्य ठेवत याची घोषणा केली होती. हे लक्ष्य अखेर आयुक्तांनी मुंबईत गाठण्याची किमया साध्य केली आहे. मुंबईत सोमवारी दिवसभरात १ लाख ८ हजार नागरिकांचे आजवरचे विक्रमी लसीकरण पार पडले. यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील ७५ हजार ३१६ व्यक्तींचे लसीकरण झाले आहे.

असे झाले लसीकरण

मुंबईमध्ये आजवर एकाच दिवशी ८ जून रोजी ९६ हजार ८६० लोकांचे लसीकरण पार पडले होते. परंतु आजवरच्या या विक्रमी लसीकरणानंतर सोमवारी २१ जून रोजी आजवरच्या तुलनेत सर्वात विक्रमी लसीकरण पार पडले. ज्यामध्ये संपूर्ण दिवसभरात १ लाख ८ हजार १४८ लोकांचे लसीकरण झाले आहे. या लसीकरणामध्ये १८ ते ४४ वयोगटातील ७५ हजार ३१६ व्यक्तींचे लसीकरण झाले आहे. त्या खालोखाल ४५ ते ५९ वयोगटातील १६ हजार ७८८ जणांचे आणि ६० वर्षांवरील १३ हजार ६८८ व्यक्तींचे लसीकरण झाले. याशिवाय आरोग्य विभागातील १ हजार ७८ आणि फ्रंटलाईन वर्करमधील १ हजार ८ आणि परदेशात जाणाऱ्या २५३ व्यक्तींचे लसीकरण पार पडले आहे. यामध्ये ९३ हजार ५८ व्यक्तींनी पहिला, तर १५ हजार ९० व्यक्तींनी दुसरा डोस घेतला.

(हेही वाचाः महाराष्ट्रावर डेल्टा प्लस कोरोनाचे संकट! ‘या’ जिल्ह्यांत सापडले रुग्ण!)

आयुक्तांनी केली किमया

मुंबई महापालिकेने सर्वप्रथम दिवसाला ५० हजार लसीकरणाचे लक्ष्य ठेवले होते. पण त्यानंतर त्यांनी १ लाख लसीकरणाचे लक्ष्य जाहीर केले. त्यामुळे सोमवारी एकाच दिवशी एक लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण करुन, आयुक्तांनी हे लक्ष्य गाठण्याची किमया केली आहे. आतापर्यंत एकूण ४५ लाख ७० हजार ९१५ लोकांचे लसीकरण पार पडले असून, यामध्ये ३६ लाख ७५ हजार ९२५ व्यक्तींनी पहिला डोस, तर ८ लाख ९४ हजार ९९० व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे.

कोविशिल्ड

महापालिका केंद्र : २२ लाख ८१ हजार ५५५ लसीकरण

शासकीय केंद्र : २ लाख ५२ हजार ८६२ लसीकरण

खासगी केंद्र : १७ लाख १९ हजार ७५७ लसीकरण

कोव्हॅक्सिन

महापालिका केंद्र : १ लाख २२ हजार ३७३

शासकीय केंद्र : ४५ हजार ६८८

खासगी केंद्र : १ लाख ४७ हजार ७७०

स्फुटनिक पाच

लसीकरण : ९१०

(हेही वाचाः मुंबईतील कोरोनाचा पारा उतरला, मृत्यूचा आकडा एकेरी!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.