महाराष्ट्रासाठी वरदायिनी असलेल्या कोयना धरणासह पश्चिम घाटातील १२ पैकी आठ धरणे काठोकाठ भरली आहेत. १०५.२५ टीएमसी पाणीसाठा क्षमता असलेले कोयना धरण (Koyna Dam) बुधवार, 5 सप्टेंबर रोजी सकाळी शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे पुढील वर्षभर वीज निर्मिती आणि सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोयना जेमतेम ८५ टक्के भरले होते.
(हेही वाचा – मंत्री अब्दुल सत्तार Manoj Jarange यांच्या भेटीला; रात्री उशिरापर्यंत चर्चा)
सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असला, तरी गेल्या दोन महिन्यात पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुबलक पावसाने पाण्याची मोठी आवक होत आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित राखण्यासाठी सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. कोयनेतून बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून सहा वक्र दरवाजातून ९ हजार ५४६ तर पायथा विद्युत गृहातून २१०० असा ११ हजार ६४६ क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे.
१०५.२५ टीएमसी पाणीसाठा क्षमता असलेल्या या कोयना धरणावर सातारा, सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील सिंचन योजना, तसेच कराड, सांगली, मिरज शहरासह नदीकाठच्या शेकडो गावांच्या पाणी योजना अवलंबून आहेत. महाराष्ट्रासाठी जलविद्युत निर्मितीचा महत्त्वाचा प्रकल्प म्हणून कोयनेचे महत्त्व मोठे आहे. बुधवारी सकाळी हे धरण शंभर टक्के भरल्याने धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा जमा झाला.
कोयना धरणासह पश्चिम घाटातील १२ पैकी आठ धरणात शंभर टक्के जलसाठा झाला आहे. दूधगंगा ९३ टक्के, धोम, चांदोली ९७ टक्के आणि राधानगरी धरणात ९९ टक्के पाणीसाठा झाला आहे. कृष्णा खोऱ्यातील शंभर टक्के पाणीसाठा झालेली धरणे- कोयना, कण्हेर, तुळशी, कासारी, पाटगांव, धोम-बलकवडी, उरमोडी आणि तारळी या धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. (Koyna Dam)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community