महाविकास आघाडी सरकार पावसाळी अधिवेशनापासून पळ काढत आहे. कोरोना आटोक्यात येत असूनही सरकार कोरोनाचे कारण पुढे करत दोन दिवसीय अधिवेशन घेत आहे. मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सरकार किती गंभीर आहे, हे यावरून दिसत आहे. अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
सरकारचा नाकर्तेपणा जनतेसमोर
ठाकरे सरकारने दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी तीव्र निषेध व्यत्त केला. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शाळा बंद आहेत, रोजगाराची गाडी रुळावर आलेली नाही. आशा वर्कर्स, परिचारिका यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. अधिवेशन कार्यक्रम पत्रिकेत दाखवण्यात आलेले कार्यक्रम घेणे अपेक्षित होते, ते देखील सरकराने केले नाही. यातून सरकराचा नाकर्तेपणा जनतेसमोर आला असल्याची खंत दरेकर यांनी व्यक्त केली.
(हेही वाचाः पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसांचे! विरोधकांनी केला हल्लाबोल)
अपयश झाकण्यासाठीचा प्रयत्न
दोन दिवसांच्या या अधिवेशनाचा पहिला दिवस शोक प्रस्तावात जाणार असून, महाराष्ट्रातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यावर एका दिवसात काय चर्चा करणार, हे राज्यकर्त्यांना कळायला हवं. जेव्हा-जेव्हा अधिवेशन जवळ येतं, तेव्हा कोरोना वाढल्याचा बहाणा पुढे करत राज्याचं अधिवेशनंच घेऊ नये, असा सरकारचा प्रयत्न दिसतो. एकीकडे कोरोनाचे कारण पुढे करत अधिवेशन पुढे ढकलायचे आणि दुसरीकडे राज्यकर्ते गर्दी असणाऱ्या कार्यक्रमात सहभाग घेतात. तेव्हा राज्यकर्त्यांना कोरोना असल्याचे आठवत नाही का? असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला. आपलं अपयश झाकण्यासाठी केवळ दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचा सरकारचा डाव आहे.
प्रश्न सोडवायला वेळ नाही
अनेक दिवस महाविकास आघाडीत खटके उडाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यातून हे सिध्द होते की, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सत्तेची ऊब मिळवण्यासाठी एकत्र आहेत. सरकारमध्ये एकमत नसून सत्तेत असणाऱ्या पक्षात देखील एक मत नाही. असे असताना लोकशाहीचे प्रश्न सोडवण्याकरता राज्य सरकरला वेळ कसा मिळेल, असा घणाघाती आरोप दरेकर यांनी केला.
(हेही वाचाः जेव्हा नार्वेकर म्हणतात, ‘यांना आताच शिवबंधन बांधा!’)
Join Our WhatsApp Community