मागील १५ दिवसांपासून एस. टी. कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत अनिश्चितता होती. ७ जून रोजी मिळणारा पगार महिना अखेर झाला तरीही झाला नव्हता. त्यामुळे कर्मचा-यांच्या मध्ये असंतोष पसरला. कर्मचा-यांचा थकित पगार त्वरित मिळावा यासाठी महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसच्या वतीने राज्य सरकारला पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आला. संघटनेसह सर्व संबंधितानी केलेल्या प्रयत्नामुळे शासनाने ६०० कोटी रुपये निधी मंजूरही केला. पण तरीही तो एस. टी. कडे वर्ग न झाल्याने आजपर्यंत कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही.
त्यामुळे मंगळवारी महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसच्या वतीने कर्मचाऱ्यांनी मुंबई सेंट्रल येथे कोरोना प्रादुर्भाव संबंधित सर्व नियमांचे पालन करुन, महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करत “शासनाला सुबुद्धी मिळो, आणि पगार लवकरात लवकर होऊ दे, असे साकडे घालून, प्रतिकात्मक संदेश देण्यात आला.
पगाराचा प्रश्न निकाली निघाला
अचानक शासनाकडून ३०० कोटी एस. टी. कडे वर्ग करण्याचे आदेश प्राप्त झाले. खरे तर हा निधी शासनाकडून मिळणारच होता. पण तो आजपर्यंत एस. टी. कडे वर्ग झाला नव्हता. कसाही निधी प्राप्त होऊ दे, पण हा निधी प्राप्त झाल्याने निदान या महिन्याच्या पगाराचा प्रश्न तरी निकालात निघाला. महादेवाला घातलेला अभिषेक हा प्रतिकात्मक होता. यातून शासन व एसटी प्रशासन यांना संदेश पोहोचवण्याचा उद्देश होता, कदाचित हा योगायोग असेल. पण श्रध्दा व संदेश या दोन्हीमुळे असेल किंवा योगायोग असेल पण प्रश्न निकाली निघाला. शासन व एस. टी. प्रशासनाला धन्यवाद देऊन या प्रतिकात्मक कार्यक्रमाचा समारोप झाला.
या वेळी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत काकडे, कार्याध्यक्ष डी. ए. लिपणे, कोषाध्यक्ष संतोष गायकवाड, फैयाज पठाण, मनीषा कालेश्वर, कविता लांजेवार, मिलिंद हिवसे,महेश मिश्रा, संदीप कातकर, अनिल तरडे आदी पदाधिकारी हजर होते.
Join Our WhatsApp Community