Ganeshotsav 2024 : हिंदूसंघटन आणि लोकजागृतीचे प्रभावी माध्यम होत आहे गणेशोत्सव!

180
  • सुनील घनवट

लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदूंचे संघटन करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2024) सुरुवात केली. त्या वेळी गणेशोत्सव हे देशावरचे आघात कमी काळात सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम बनत आहे. टिळकांच्या नंतर वेळोवेळी गणेशोत्सवाचे स्वरूप पालटत गेले. आता मात्र टप्प्याटप्प्याने सामाजिक परिवर्तन गणेशोत्सव मंडळांमध्येही दिसून येत आहे. गणेशोत्सव हे हिंदूसंघटनाचे, लोकजागृतीचे आणि प्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम बनले आहे. अनेक गणेशोत्सव मंडळे गेल्या काही वर्षांपासून हिंदुजागृतीचे कार्य प्रभावीपणे करू लागली आहेत.

ऐतिहासिक, पौराणिक विषयांवर प्रकाश टाकणारे देखावे

गेल्या काही वर्षांपासून विविध शहरांतील गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) मंडळे प्रबोधन करणाऱ्या विषयांवर देखावे करण्यास प्राधान्य देत आहेत. गेल्या काही वर्षांत गावागावांतील मंडळे व्यसनाधीनता, प्रथमोपचार, रक्तदान, वाढती लोकसंख्या अशा सामाजिक विषयांवर देखावे करून प्रबोधन करत आहेत. पालघर जिल्ह्यातील श्रद्धा वालकर हिची लव्ह जिहादमधून निर्घृण हत्या झाल्यानंतर अनेक मंडळांनी लव्ह जिहादविषयी जागृती निर्माण करणारे देखावे सादर केले. काही मंडळांनी १९९० साली जिहाद्यांनी स्वतःच्या घरातून नेसत्या वस्त्रानिशी विस्थापित होण्यास भाग पाडलेल्या काश्मिरी हिंदूंच्या समस्यांवर देखाव्याच्या माध्यमातून प्रकाश टाकला होता.

बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीवरही एका मंडळाने प्रकाश टाकला होता. गड-किल्ले, मंदिरांची निर्मिती या विषयांवरील देखाव्यांच्या माध्यमातून अनेक मंडळे इतिहासाविषयी जागृती करत आहेत. काही मंडळे त्या त्या काळात घडलेल्या महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर प्रकाश टाकत आहेत. थोडक्यात गणेशोत्सव मंडळांतील देखावे हे एक समाजप्रबोधनाचे स्थान अशी नवीन ओळख रूजत आहे. मुंबईतील गिरगावात केशवजी नाईक चाळ गणपती आहे. हा मुंबईतील पहिला आणि सर्वांत जुना गणपती आहे. या गणपती मंडळाला लोकमान्य टिळकांनीही भेट दिली आहे. तेथे अजूनही आरती, सजावट पारंपरिक पद्धतीने केली जाते.

(हेही वाचा – Paris Paralympics : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत प्रवीण कुमारला सुवर्ण)

पथकांच्या माध्यमातून हिंदू संस्कृतीचे जतन

२००७ ते साधारण २०२० पर्यंत म्हणजे साधारण कोरोनाच्या काळापर्यंत गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) मिरवणुकांमध्ये धांगडधिंगा आणि डीजेच्या दणदणाटाचे पेवच फुटले होते. कोरोनानंतर मात्र तेही बदलत आहे. आता अनेक ठिकाणी ‘डीजेमुक्त गणेशोत्सव’ सारख्या संकल्पना रुजत आहेत. विविध पारंपरिक वाद्यांना आता मिरवणुकीमध्ये मानाचे स्थान मिळत आहे. पथनाट्यांमध्येही विविध लोककलांचा समावेश केलेला असतो. त्यामुळे विस्मृतीत गेलेल्या अनेक लोककलांना पुन्हा सामाजिक प्रतिष्ठा मिळत आहे. लोकमान्य टिळकांनी जो सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला, त्या वेळी तो पारंपरिक पद्धतीने आणि हिंदूंना संघटित करण्याच्या उद्देशाने चालू केला. गेल्या काही वर्षांतील गणेशोत्सव मंडळांची वाटचाल पाहत ‘पुन्हा एकदा पारंपारिकतेकडे’ असा संदेश मिळत आहे.

एकतेचा आणि संघटनाचा संदेश

उरी येथील आतंकवादी हल्ल्यानंतर देशभर आतंकवादाचे सावट होते. अशा स्थितीतही कोणत्याच गणेशोत्सव मंडळाने माघार घेतली नव्हती. राज्यातील विविध मुसलमानबहुल भागांत मशि‍दीतून गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) मिरवणुकांवर दगडफेक होण्याचे प्रकारही घडलेले आहेत. अशा स्थितीतही हिंदू जराही न डगमगता, उत्साहाने मिरवणुका काढतात. त्याने हिंदूंमधील एकी तर वाढत आहेच; त्यासोबत सतर्कताही वाढत आहे. गेल्या काही वर्षांपासून ‘एक गाव, एक गणपती’, ‘एक वॉर्ड एक गणपती’, अशा संकल्पनाही मोठ्या प्रमाणात स्वीकारल्या गेल्या आहेत. हे संघटनाच्या दिशेने उचललेले मोठे पाऊल आहे.

(हेही वाचा – शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा फिक्स; पण उद्धव ठाकरे नाही; Devendra Fadnavis यांचा दावा)

स्वयंसेवी संघटनांचे कार्य

अनेक स्वयंसेवी संघटना गणेशोत्सव काळात प्रथमोपचार देण्याचे, गर्दी नियंत्रणाचे कार्य करत आहेत. या संघटनांच्या माध्यमातूनही समाजासाठी काही तरी करण्याकरिता संदेश सर्वत्र जात आहे.

गणेशोत्सव मंडळांना सरकारचे प्रोत्साहन

अनेक शहरांमध्ये आदर्श मिरवणुका काढणाऱ्या मंडळांना शासन आणि स्थानिक प्रशासनाकडूनही पारितोषिक देण्यात येते. एक खिडकी योजनेमुळे सर्व अनुमती एकाच छताखाली मिळत आहेत. त्यामुळे गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) मंडळांकडून जे कार्य होत आहे, त्याला सरकारचेही प्रोत्साहन मिळत आहे. गणेशोत्सव मंडळांनी राष्ट्र आणि धर्म यांसमोर असलेल्या मोठ्या समस्या उदा. लव्ह जिहाद, धर्मांतर यांच्या विरोधात कायदे करावे, इत्यादी मागण्या सरकार दरबारी केल्यास ही हिंदूशक्ती विधायक कारणासाठी वापरली गेली, असे होईल. गणेशोत्सवाच्या काळात गावागावांत जागृत असणारा हा सामाजिक आणि हिंदुत्वाचा विचार राष्ट्रीय पातळीवर पोहोचल्यास हिंदु राष्ट्राविषयीही जागृती होणार आहे. येत्या काळात श्री गणेशाच्या चरणी एकवटणाऱ्या या प्रचंड मोठ्या हिंदूसंघटनाच्या माध्यमातून हिंदू राष्ट्राचा प्रसार सर्वदूर पोहोचावा, हीच प्रार्थना!

(लेखक हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक आहेत.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.