मुंबई पोलिसांनी वर्षभरापूर्वीच उघडकीस आणलेल्या कथित टीआरपी घोटाळा प्रकरणात मंगळवारी दुसरे पुरवणी आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. या दुसऱ्या पुरवणी आरोपपत्रात रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह ७ जणांना आरोपी दाखवण्यात आलेले आहे. या संपूर्ण घोटाळ्यात आरोपीची संख्या २२ झालेली असून पुरवणी आरोप पत्रासह आतापर्यंत पोलिसांनी ६,८५० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे.
याप्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली!
मुंबई पोलिसांनी ऑक्टोबर २०२० मध्ये टीआरपी घोटाळा उघडकीस आणला होता. मुंबईसह इतर जिल्ह्यांतून याप्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आलेली होती, त्यात बार्क या संस्थेचे पदाधिकारी यांचा देखील समावेश होता. या टीआरपी घोटाळ्यात काही वृत्तवाहिन्यांसह मनोरंजन वाहिन्यांचा देखील सहभाग समोर आला होता. रिपब्लिकन वृत्त वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी हे देखील याप्रकरणात संशयित होते. त्याच्याकडे चौकशी देखील कऱण्यात आली होती, मात्र एफआयआरमध्ये त्याचे कुठेही नाव नव्हते.
(हेही वाचा : बोगस लसीकरण जनतेच्या जीवाशी खेळ! मुंबई उच्च न्यायालयाकडून कारवाईचे आदेश )
तिसऱ्या पुरवणी आरोपपत्रात अर्णब गोस्वामींचे नाव!
दरम्यान याप्रकरणात अटक टाळण्यासाठी तसेच हा गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी अर्णब गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान पोलिसांनी आणखी ३ जणांना या प्रकरणात अटक करून त्यांच्याविरूद्ध जानेवारी महिन्यात ३,५६५ पानाचे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यात देखील अर्णब गोस्वामी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नव्हता. मात्र मंगळवारी मुंबई पोलिसांनी १,९१२ पानांचे दुसरे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यात त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह ७ जणांच्या नावाचा समावेश असून त्यांना या प्रकरणात आरोपी दाखवण्यात आलेले आहे.