Ganeshotsav 2024 : श्री गणेशाचे उपासनाशास्त्र, कार्य आणि वैशिष्ट्ये

194
Ganeshotsav 2024 : श्री गणेशाचे उपासनाशास्त्र, कार्य आणि वैशिष्ट्ये
आपल्या उपास्यदेवतेची वैशिष्ट्ये अन् तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती ज्ञात झाल्यास देवतेप्रती श्रद्धा निर्माण होते. त्यामुळे साधना चांगली होण्यास साहाय्य होते. हा उद्देश लक्षात घेऊन श्री गणेश या देवतेचे कार्य, वैशिष्ट्ये आणि उपासनेच्या संदर्भातील उपयुक्त अध्यात्मशास्त्रीय माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखामध्ये दिली आहे.
श्री गणेशाच्या या ध्यानमंत्रामध्ये त्याच्या गुणवैशिष्ट्यांंचे वर्णन आहे. गणपति हे श्री गणेशाचे एक नाव आहे. गणपति हा शब्द गण आणि पति या दोन शब्दांनी बनला आहे. गण याचा अर्थ पवित्रक. पति म्हणजे पालन करणारा. गणपति सूक्ष्मातीसूक्ष्म चैतन्यकणांचा म्हणजे पवित्रकांचा स्वामी आहे. श्री गणेश जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणार्‍या रजतम लहरींवर नियंत्रण ठेवतो, तसेच लवकर प्रसन्न होतो. (Ganeshotsav 2024)
श्री गणेशाचे कार्य आणि वैशिष्ट्ये
१. विघ्नहर्ता : विघ्नहर्ता असल्याने लोकनाट्यापासून विवाहापर्यंत, तसेच गृहप्रवेशादी सर्व विधींच्या आरंभी श्री गणेशपूजन असते.
२. विवेकबुद्धी निर्माण करून चित्त शांत करणारा : श्री गणेश हा ब्रह्मांडातील दूूषित शक्ती आकर्षून घेणारा आहे, तसेच मनुष्याच्या बुद्धीमध्ये विवेक निर्माण करणारा आहे. श्री गणेशाच्या उपासनेमुळे विकल्पशक्ती प्रभाव पाडत नाही. बुद्धी स्थिर राहून चित्त शांत रहाते. मी कोण, भगवंताने मला या जगतात कशासाठी पाठवले, याची साधकाला जाणीव होऊन तो श्रद्धापूर्वक कार्य करू लागतो. साधकाच्या भावात वाढ होऊन त्याची उत्तरोत्तर प्रगती होऊ लागते. – प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, पनवेल.
३. संगीत आणि नृत्य यांत प्रवीण असलेला : स्वरब्रह्माचा आविष्कार म्हणजे ओंकार. श्री गणेशालाही ओंकारस्वरूप श्री गणेशा असे म्हटले आहे. श्री गणेश वरदस्तोत्रातील अनेक श्‍लोकांवरून गणेशाचे संगीताशी असलेले नाते स्पष्ट होते. ज्ञानेश्‍वरमाउली, संत नामदेव, समर्थ रामदासस्वामी आदी संतांच्या अभंगरचनांतूनही गणेशाचा संगीताशी असलेला निकटचा संबंध लक्षात येतो. नर्तकरूपातील गणरायाच्या मूर्तीही आढळतात. सोनेरी देहकांतीच्या या गणपतीला आठ हात असून त्याचा डावा पाय पद्मासनात आहे, तर उजवा पाय अधांतरी आहे. मध्व मुनीश्‍वरांनी ये गणराया मंगलमूर्ति । पतित पावन दीनदयाळा । त्रिभुवनी सोज्वळ तुझी कीर्ती । कीर्तनरंगी नृत्य करी रे, संगीताची मिळवूनी पूर्ती ॥, अशी श्री गणेशाच्या नृत्यसंपदेची महती वर्णिली आहे. गजाननाचे नृत्य पाहून गंधर्व-अप्सराही लज्जित होतात, असे सांगतांना कवी मोरोपंतांनी श्री गणेशाचे मनोहर रूप शब्दसंपदेने आणि कल्पनासौंदर्याने उत्तमरित्या चितारले आहे.
४. वाक्देवता : गणेश प्रसन्न झाला की, वाक्सिद्धी प्राप्त होते. (Ganeshotsav 2024)
श्री गणेशाच्या पूजेत तांबड्या रंगांच्या वस्तू असण्याचे कारण : श्री गणेशाच्या पूजेत तांबड्या रंगांच्या वस्तूंचा उपयोग करावा. तांबड्या रंगात गणेशतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे मूर्ती अल्पावधीत जागृत होण्यास साहाय्य होते. यासाठीच श्री गणेशाच्या पूजेत रक्तचंदन वापरतात.
श्री गणेशाला लाल फुले वहाण्याचे महत्त्व आणि प्रमाण : श्री गणेशाला तांबड्या जास्वंदाची फुले वहावीत. श्री गणेशाला फुले वहातांना ती ८ किंवा ८ च्या पटीत आणि शंकरपाळ्याच्या आकारात वहावीत. शंकरपाळ्याच्या आकारात फुले वहातांना दोन लहान कोन एका सरळ रेषेत देवतेच्या समोर येतील आणि मोठे दोन कोन दोन बाजूंना दोन रहातील, अशा पद्धतीने फुले वहावीत. जास्वंद वा अन्य लाल फूल वाहतांना देठ श्री गणेशाच्या चरणांकडे आणि तुरा आपल्याकडे येईल, असे वाहावे. (Ganeshotsav 2024)
श्री गणेशाला दूर्वा वहाण्याचे कारण आणि पद्धत : दूर्वांमध्ये श्री गणेशाचे तत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अत्याधिक प्रमाणात असते; म्हणून श्री गणेशाला दूर्वा वहाव्यात. त्यामुळे श्री गणेशाचे तत्त्व मूर्तीत येते आणि देवतेच्या तत्त्वाचा आपल्याला अधिक लाभ होतो. श्री गणेशाला दूर्वा नेहमी विषम संख्येने (न्यूनतम ३ किंवा ५, ७, २१ इत्यादी) वाहाव्यात. श्री गणेशाला वहायच्या दूर्वा नेहमी कोवळ्या असाव्यात. दूर्वांना ३,५,७ अशा विषम संख्येच्या पात्या असाव्यात. दूर्वा वहातांना पात्यांचा भाग आपल्याकडे आणि देठाचा भाग श्री गणेशाच्या मूर्तीकडे असावा. त्यामुळे श्री गणेशाचे तत्त्व आपल्याकडे प्रक्षेपित व्हायला साहाय्य होते.
श्री गणेशाच्या तारक आणि मारक तत्त्वाप्रमाणे वापरायच्या उदबत्ती : श्री गणेशाची पूजा करतांना त्याचे तारक तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करण्याकरता चंदन, केवडा, चमेली आणि वाळा यांपैकी कोणत्याही गंधाच्या उदबत्त्या वापराव्यात. श्री गणेशाचे मारक तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करण्याकरता हीना अथवा दरबार या गंधांच्या उदबत्त्या वापराव्यात.
श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर 1000 पटींनी कार्यरत असते. या कालावधीत गणेशतत्त्वाचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी या || ॐ गं गणपतये नमः || हा नामजप जास्तीत जास्त करु शकतो. (Ganeshotsav 2024)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.