-
सचिन धानजी,मुंबई
मुंबईतील सर्व रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रिटचे (C C Road) करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटच्या (C C Road) कामांना प्रशाससकांनी मंजुरी दिल्यानंतर शहर भागांतील दोन्ही टप्प्यातील रस्ते विकास कामांना प्रशासकांनी मंजूरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात २१२ आणि दुसऱ्या टप्प्यात २९५ अशाप्रकारे सुमारे १३५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिट (C C Road) कामांना मंजूरी मिळाल्यामुळे आता या शहर भागांतील रस्त्यांच्या कामांना १ ऑक्टोबरपासून सुरु होणे अपेक्षित मानले जात आहे.
मुंबईत सुमारे २०५० कि.मी.लांबीचे रस्ते हे महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत असून त्यातील सुमारे ५४० कि.मी. रस्ते हे केवळ शहर भागांत आहेत. या शहर भागांतील सुमारे २५५ कि.मी. रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण (C C Road) करण्यात आल्याचा दावा महापालिका रस्ते विभागाकडून केला जात आहे. त्यामुळे आजमितीस ५३ टक्के रस्ते हे डांबरी तथा पेव्हब्लॉकचे शिल्लक राहिले आहेत. त्यानुसार शहर भागांतील उर्वरीत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण (C C Road) करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात ७१. ९१ कि. मी. लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी निविदा मागवून कंत्राटदाराची निवड करण्यात आली होती.
(हेही वाचा – किमान तुमच्या घरात तरी मातृभाषेत बोला; केंद्रीय मंत्री Amit Shah यांनी केले आवाहन)
परंतु, नेमणूक झालेले कंत्राटदार मे. रोडवे सोल्युशन्स इंडिया इन्फ्रा लिमिटेड या कंपनीने कंत्राट निविदेतील अटी व शर्तीची पुर्तता न केल्याने तसेच काम सुरु करण्यास अक्षम्य दिरंगाई केल्याने ०९ नोव्हेंबर २०२३ रोजी हे कंत्राट रद्द करण्यात आले. तसेच त्यांना या प्रकरणी ६४ कोटींचा दंड आकारण्यात आला. या निविदेतील कंत्राट कामांमधील २१२ रस्त्यांपैकी डी विभागातील ३ रस्ते व सी विभागातील १ रस्ता असे मिळून एकूण ४ रस्त्यांचे काम करण्यात आले. त्यामुळे उर्वरीत २०८ रस्त्यांची सुधारणा व मजबुतीकरण करण्यासह २७ रस्त्यांवरील जुन्या तुटलेल्या पॅनल्सची दुरुस्ती आदींचे काम करण्यासाठी टप्पा एक अंतर्गत नव्याने निविदा मागवण्यात आली आहे. यामध्ये एनसीसी लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली आहे, या कंपनीने महापालिकेच्या अंदाजपत्रकानुसार ९.९० टक्के अधिक दर आकारले होते, त्यानंतर वाटाघाटीमध्ये या कंपनीने दर कमी करत ४ टक्के अधिक दर देण्याची तयारी दर्शवल्याने अखेर या दरात महापालिकेने हे कंत्राट मंजूर केले. त्यामुळे शहर भागातील टप्पा एक अंतर्गत रस्ते विकासकामांसाठी १९३८ कोटी रुपयांचे प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे.
तर टप्पा दोन अंतर्ग शहर भागांतील ६५.०६ कि.मी लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण (C C Road) करण्यासाठी निविदा मागवण्यात आली आहे. या दुसऱ्या टप्प्यात २९५ रस्त्यांचा विकास केला जाणार आहे. या रस्ते कामांसाठी जीएचव्ही (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (GHV (India) Private Limited) हीं संयुक्त भागीदारीतील कंपनी पात्र ठरली आहे. या रस्ते कामांमध्येही कंत्राटदाराने (C C Road) महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा ९.०१ टक्के अधिक बोली लावली होती, परंतु या कंपनीने वाटाघाटीनंतर पाच टक्के दर कमी करून ४ टक्के अधिक दराने काम करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे या रस्ते विकासासाठी १६२४.६८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community