- विशेष प्रतिनिधी, मुंबई
अंधेरी पश्चिम वर्सोवा येथेच आता बोरी मुसलमान समाजासाठी कब्रस्थान (Cemetery) आता उपलब्ध होणार आहे. वर्सोवा येथील एक भूखंड हा प्राथमिक आणि माध्यमिक शाळेसाठी आरक्षित असून हे शाळेचे आरक्षण बदलून त्यावर कब्रस्तानाचे आरक्षण बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या दृष्टीकोनातून आता महापालिकेच्यावतीने नगरविकास खात्याशी पत्रव्यवहार करून ही पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
वर्सोवा येथील नगर भू क्रमांक ३/१/१ या सुमारे ६५४७.२२ चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर १९९१ च्या मंजूर विकास नियोजन आराखड्यानुसार स्मशानभूमीचे आरक्षण दर्शविण्यात आले होते. त्यानंतर विकास आराखडा २०३४मध्ये या भूखंडावरील स्मशानभूमीचे (Cemetery) आरक्षण हे कायम ठेवण्यात आले होते. पण त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अर्थात ३१ जुलै२०१७ च्या ठरावानुसार या विकास आराखड्यात स्मशानभूमीचे हे आरक्षण बदलून त्यावर प्राथमिक व माध्यमिक शाळा हे आरक्षण प्रस्तावित केले.
(हेही वाचा – आरक्षण संपवण्याविषयी Rahul Gandhi यांचे विधान; काँग्रेस अडचणीत)
वर्सोवा या भूखंडावरील या मंजूर विकास आराखडा २०३४ मधील RE प्राथमिक व माध्यमिक शाळा हे आरक्षण बदलून RSA 4.8 (स्मशानभूमी) चे आरक्षण अंतर्भूत करण्याबाबत स्थानिक भाजपाच्या आमदार भारती लव्हेकर यांनी १३ जून २०२४ रोजी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून मागणी केली. त्यानुसार महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ मधील अधिनियम ३७ (१) अन्वये प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. या भूखंडावर भूखंडावर बोहरी मुस्लिम समाजाकरिता कब्रस्थानासाठी (Cemetery) जागा उपलब्ध करून देण्याची विनंती आमदारांनी केली आहे.
वर्सोवा विधानसभा मतदारसंघात बोहरी समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात राहतात. परंतु, त्यांना एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर दफनविधीकरिता सुमारे ३० किमी दूर मरिन लाईन्स येथील कब्रस्थानात नेण्याशिवाय पर्याय नसतो असे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. यापूर्वी माजी खासदार गजानन किर्तीकर यांनीही तत्कालीन महापौर यांच्याकडे बोहरी समाजाच्या स्मशानभूमीसाठी (Cemetery) भूखंड वितरीत करावा याकरिता मागणी केली होती. या लोकप्रतिनिधींच्या माण्गीनुसार भूखंडावर विकास नियोजन आराखडा १९९१ मधील तरतूदींनुसार व प्रारूप विकास आराखडा २०३४ मध्ये दर्शविल्याप्रमाणे स्मशानभूमी हे आरक्षण दर्शविण्यात यावे, अशी महानगरपालिकेची धारणा आहे. त्यामुळे वर्सोवा मधील या भूखंडावरील मंजूर प्राथमिक व माध्यमिक शाळा हे आरक्षण बदलून स्मशानभूमी चे आरक्षण अंतर्भूत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यादृष्टीकोनातून विकास नियोजन आराखडा २०३४ मध्ये फेरफार करण्यात येणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community