BEST Bus ने मरीन ड्राईव्हला जाताय? आपले मोबाईल फोन सांभाळा

311
BEST Bus ने मरीन ड्राईव्हला जाताय? आपले मोबाईल फोन सांभाळा
  • प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (फोर्ट) किंवा चर्चगेट येथून मरीन ड्राईव्ह, मंत्रालय, गेटवे ऑफ इंडिया येथे जाण्यासाठी बेस्ट बसने (BEST Bus) प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल फोन चोरणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असून या टोळीने एकाच दिवसात ४ प्रवाशांचे मोबाईल फोन चोरी केल्याचे समोर आले आहे. यामध्ये एका पोलीस कॉन्स्टेबल आणि आमदार निवासातील कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

दक्षिण मुंबईतील मंत्रालय, एअर इंडिया इमारत, मरीन ड्राईव्ह, इत्यादी ठिकाणी नोकरीसाठी येणारे, तसेच पर्यटनासाठी येणारे प्रवास करण्यासाठी मुंबई सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) किंवा चर्चगेट येथून बेस्ट बसचा (BEST Bus) वापर करतात, बेस्टने एसी बस सुरू केल्यापासून बहुतांश जण बेस्ट बसचा वापर करीत असल्यामुळे बेस्ट बस मध्ये गर्दी वाढली आहे. याचा फायदा दक्षिण मुंबईतील पाकिटमार आणि मोबाईल फोन चोरी करणाऱ्या टोळ्या घेत आहे.

(हेही वाचा – Cabinet Meeting : शिष्यवृत्तीत एकसमानता आणण्यासाठी समिती; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय)

गर्दीच्या वेळी प्रवाशाचे मोबाईल फोन चोरी करून पुढच्या थांब्यावर (स्टॉप) उतरून या टोळ्या रफुचक्कर होतात. रविवारी सुट्टीच्या दिवशी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे चार गुन्हे दाखल झाले आहे. आकाशवाणी आमदार निवास येथील कर्मचारी सुरेंद्र जाधव यांनी रविवारी सायंकाळी एलआयसी इमारत येथे जाण्यासाठी सीएसएमटी येथून बेस्ट बस (BEST Bus) रूट क्रमांक १२६ क्रमाकांची बस पकडली, ते एलआयसी इमारत येथे उतरले असता त्यांचा मोबाईल फोन मिळून आला नाही.

दुसऱ्या घटनेत ओबोरॉय हॉटेल मध्ये काम करणारे प्रतीक घुमरे यांनी एअर इंडिया इमारत मरीन ड्राईव्ह येथून बेस्ट बस पकडून सीएसएमटी आले असता त्यांचा मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने चोरल्याचे लक्षात आले. तिसऱ्या घटनेत मुंबई पोलीस दलातील दंगल नियंत्रण कक्षात कार्यरत असणारे पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय पाटील यांनी देखील एअर इंडिया इमारत येथून बेस्ट बस मध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यानी त्याच्या खिशातून मोबाईल फोन चोरी केला. चौथी घटना देखील एअर इंडिया इमारती जवळील बस थांब्याजवळ घडली. मरीन ड्राईव्ह येथे फिरण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाच्या मोबाईल फोन बेस्ट बस (BEST Bus) मध्ये चोरीला गेला. या चारही घटना एकाच दिवशी रविवारी घडल्या असून याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईल चोरीच्या घटना गर्दीच्या वेळी अधिक प्रमाणात होतात, मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस साध्या वेशात बस थांब्यावर तैनात करण्यात आलेले आहे, तसेच सीसीटीव्ही फुटेजची मदत घेण्यात येत आहे, लवकरच या टोळीला अटक करण्यात येईल अशी माहिती मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वपोनि. निलेश बागुल यांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.