राहुल गांधींचा आरक्षणविरोधी चेहरा उघड; अमेरिकेतील वक्तव्याचा Devendra Fadnavis यांनी घेतला समाचार

167
राहुल गांधींचा आरक्षणविरोधी चेहरा उघड; अमेरिकेतील वक्तव्याचा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला समाचार
राहुल गांधींचा आरक्षणविरोधी चेहरा उघड; अमेरिकेतील वक्तव्याचा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला समाचार

राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत अमेरिकेत केलेल्या वक्तव्याचा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे. ‘राहुल गांधी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर नेहमीच देशविरोधी वक्तव्ये केली आहेत, जी कोणत्याही प्रकारे राष्ट्रहिताच्या दृष्टीने नाहीत. आरक्षण संपवण्याबाबत राहुल गांधी यांनी नुकतेच केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात राहुल गांधी आणि काँग्रेसने आरक्षणाबाबत खोटी कथा पसरवली पण आता त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. राज्यघटनेचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण कोणीही संपवू शकत नाही. राहुल गांधींनी कोणत्याही व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न केला तरी देशातील प्रत्येक वर्गाला त्यांचे हक्क मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

(हेही वाचा – Ayushman Bharat : आयुष्यमान भारत योजनेच्या विस्तारामुळे सरकारवर साडेतीन हजार कोटींचा भार)

काय म्हणाले होते राहुल गांधी ?

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत बसून आरक्षणासंदर्भातील आपली योजना सांगितली आहे. काँग्रेस आरक्षण संपवू शकते, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे, मात्र त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे. ते म्हणजे निष्पक्षता म्हणजेच समानता. भारतात आरक्षणाच्या बाबतीत निष्पक्षता असेल तेव्हाच काँग्रेस पक्ष आरक्षण संपवण्याचा विचार करेल आणि आता तशी परिस्थिती नाही. प्रतिष्ठित जॉर्जटाउन विद्यापीठात विद्यार्थ्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी ही माहिती दिली.

…तेव्हा आम्ही आरक्षण संपवण्याचा विचार करू – राहुल गांधी

वॉशिंग्टनमधील युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी राहुल यांना आरक्षणाबाबत प्रश्न विचारला होता आणि ते किती दिवस सुरू राहणार असा सवाल केला होता. त्यावर ते म्हणाले, ‘जेव्हा भारतात (आरक्षणाच्या बाबतीत) निष्पक्षता येईल, तेव्हा आम्ही आरक्षण संपवण्याचा विचार करू. सध्या भारत यासाठी योग्य जागा नाही.’ राहुल गांधी म्हणाले, ‘जेव्हा तुम्ही आर्थिक आकडेवारी पाहता, तेव्हा आदिवासींना 100 रुपयांपैकी 10 पैसे मिळतात. दलितांना 100 रुपयांपैकी पाच रुपये मिळतात आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) लोकांनाही जवळपास तेवढीच रक्कम मिळते. त्यांना योग्य सहभाग मिळत नाही हे सत्य आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.