MSRTC प्रथमच नफ्यात; किती कोटी जमले, जाणून घ्या…

सध्या सरासरी ५४ लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करीत असून एसटी प्रशासनानेही गेल्या वर्षभरात "हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान", विद्यार्थ्यांना शाळेत थेट पास, प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन, श्रावणात एसटी संगे तीर्थाटन, असे अनेक अभिनव उपक्रम राबविले.

168
गेली पाच ते सहा वर्षे अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला सुगीचे दिवस सुरु झाले असून एसटीची आर्थिक घोडदौड चालू आहे. एकट्या ऑगस्ट महिन्यात एसटी महामंडळाचा १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये इतका नफा झालेला आहे.  तब्बल ९ वर्षांनी एसटी महामंडळ नफ्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. त्याचवेळी त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले असून, भविष्यातही सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून महामंडळ सातत्याने फायद्यात येईल, असे प्रयत्न करावे असे आवाहनही यावेळी केले.
दोन वर्षे कोरोना महामारी आणि त्या पाठोपाठ सहा महिने कर्मचाऱ्यांचा चाललेला दीर्घकालीन संप यामुळे एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले होते. त्यावेळी एसटी बंद पडते की काय? अशी अवस्था निर्माण झाली होती. मात्र मे २०२२ पासून एसटीची सुरळीत वाहतूक सेवा सुरू झाल्याने एसटीचा घटलेला प्रवासी पुन्हा एसटीकडे वळविणे हे एक मोठे आव्हान होते. परंतु, यावेळी राज्य शासनाने ७५ वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास व सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात ५० टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्या की, ज्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाल्याचा दावाही यावेळी कुसेकर यांनी केला.

डिझेलची बचत झाली

सध्या सरासरी ५४ लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करीत असून एसटी प्रशासनानेही गेल्या वर्षभरात “हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान”, विद्यार्थ्यांना शाळेत थेट पास, प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन, श्रावणात एसटी संगे तीर्थाटन, असे अनेक अभिनव उपक्रम राबविले. तसेच जे विभाग गेली कित्येक वर्ष तोट्यामध्ये आहेत, त्या विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडूनही पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेल्याने स्थानिक पातळीवरही आगार निहाय कर्मचारी व अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या आणि तोट्याच्या मार्गावरील बस फेऱ्या बंद करून, ज्या मार्गावर प्रवासी जास्त आहेत तेथे त्या वळविण्यात आल्या. याचबरोबर नादुरुस्ती बसेसचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेमध्ये निम्याने कमी करण्यात आले. ते १२% वरुन ६% आणण्यात आले. तसेच चालक व यांत्रिकी कर्मचाऱ्यांचेही सातत्याने प्रबोधन करुन डिझेलची खपत ०.५२ कि.मी.ने वाढविण्यात आल्याने डिझेलचीही बचत झाली. या सर्व प्रयत्नांचा एकत्रित परिपाक म्हणूनही एकट्या ऑगस्ट महिन्यामध्ये एसटी महामंडळाला १६ कोटी ८६ लाख ६१ हजार इतका नफा प्राप्त झालेल्याचेही कूसेकर यांनी यावेळी ठामपणे नमूद केले.
भविष्यात येऊ घातलेल्या स्व:मालकीच्या बसेस व भाडेतत्वावरील बसेस एसटीच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर त्याचा योग्य विनियोग करुन एसटी महामंडळ सातत्याने फायद्यात राहील यासाठी कृतीशील आराखडा तयार करुन त्याची अंमलबजावणी केली जाईल जेणेकरुन एसटीला गतवैभव प्राप्त होईल, असाही विश्वास कुसेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.