मागील १५ दिवसांपासून पगाराच्या प्रतिक्षेत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना आता अखेर महादेवच पावला, असे म्हणावा लागेल. कारण मागील १५ दिवसांपासून पगाराच्या प्रतिक्षेत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आज झाला असून, ज्या कर्मचाऱ्यांचे खाते स्टेट बँकेत आहेत त्यांचे वेतन बुधवारी, २३ जून रोजी झाले असून, ज्यांचे खाते एसटी बँकेत आहे, त्यांचे वेतन उद्या मिळेल, अशी माहिती मिळत आहे. ७ जून रोजी मिळणारा पगार महिना अखेर झाला तरीही झाला नव्हता. त्यामुळे कर्मचा-यांच्यामध्ये असंतोष पसरला होता. कर्मचा-यांचा थकित पगार त्वरित मिळावा यासाठी महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसच्या वतीने राज्य सरकारला पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आला होता.
(हेही वाचा : वेतनासाठी एस. टी. कर्मचा-यांचे शंभू महादेवाला साकडे!)
संघटनेसह सर्व संबंधितांनी केलेल्या प्रयत्नांमुळे शासनाने ६०० कोटी रुपये निधी मंजूर केला. पण तरीही तो एस.टी. कडे वर्ग न झाल्याने कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नव्हता. मात्र आता हा रखडलेला पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांचा पगार झाल्याने सर्वच एसटी संघटनांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.
कर्मचाऱ्यांनी घातले महादेवाला साकडे!
मंगळवारी महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसच्या वतीने कर्मचाऱ्यांनी मुंबई सेंट्रल येथे कोरोना प्रादुर्भाव संबंधित सर्व नियमांचे पालन करुन, महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करत ‘शासनाला सुबुद्धी मिळो आणि पगार लवकरात लवकर होऊ दे’, असे साकडे घालून, प्रतिकात्मक संदेश दिला होता. दरम्यान एसटी कर्मचारी विना वेतन असल्याचे प्रकरण ‘हिंदुस्थान पोस्ट’ने सातत्याने लावून धरले होते. अखेर आज एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात त्यांचे वेतन जमा झाले आहे.
Join Our WhatsApp Community