‘या’ सेलिब्रेटींनी दिले महापालिकेच्या रुग्णालयाला दोन व्हेंटिलेटर!

आजवर मुंबई महापालिकेला कोविड काळात अक्षय कुमार यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेकांनी मदतीचा हात दिला होता, त्यानंतर आता अमिताभ बच्चनने मदत करणाऱ्यांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे.

133

कोविड काळात अनेक दानशूर व्यक्ती आणि चित्रपट अभिनेत्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला सढळ हस्ते मदत केल्यानंतर दीड वर्षानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनीही महापालिकेसमोर हात मोकळा केला. अमिताभ बच्चन यांनी मुंबई महापालिकेच्या शीव रुग्णालयाला दोन अत्याधुनिक अतिदक्षता आयसीयू आणि सामुग्री भेट म्हणून दिली आहे. आजवर मुंबई महापालिकेला कोविड काळात अक्षय कुमार यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेकांनी मदतीचा हात दिला होता, त्यानंतर आता अमिताभ बच्चनने मदत करणाऱ्यांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे.

३० गरजू रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यात आले!

शीव परिसरात असणा-या मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयास सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ‘क्लास – १’ प्रकारातील २ अत्याधुनिक अतिदक्षता व्हेंटिलेटर देणगी स्वरुपात नुकतेच दिले आहेत. त्याचबरोबर मॉनिटर्स, सीआर्म ईमेज इन्टेन्सीफायर, इन्फ्युजन पंप इत्यादी सुमारे रुपये पावणे दोन कोटी किमतीची यंत्र सामुग्री देखील बच्चन यांनी देणगी स्वरुपात रुग्णालयास दिली आहे. या अनुषंगाने रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी रुग्णालयातील सर्व डॉक्टरांच्या व वैद्यकीय कर्मचा-यांच्या वतीने बच्चन यांचे आभार मानले आहेत. या दोन्ही ‘व्हेंटिलेटर’ हे शीव रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागात काही दिवसांपूर्वी कार्यान्वित करण्यात आले आहेत. या दोन्ही अत्याधुनिक ‘व्हेंटिलेटर’द्वारे गेल्या काही दिवसात सुमारे ३० गरजू रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती शीव रुग्णालयाद्वारे देण्यात आली आहे.

(हेही वाचा : पावसाळी अधिवेशन २ दिवसांचेच! भाजपने राज्यपालांकडे नोंदवला आक्षेप!  )

या आधीही अमिताभ बच्चन यांनी महापालिकेला केलेली मदत!

बच्चन यांच्याद्वारे देणगी स्वरुपात प्राप्त झालेले दोन्ही ‘व्हेंटिलेटर’ हे संगणकीय प्रणाली आधारित अत्याधुनिक व अद्ययावत ‘व्हेंटिलेटर’ आहेत. या यंत्रांद्वारे ज्या रुग्णांची प्राणवायू (ऑक्सिजन) पातळी खालावलेली आहे, अथवा ज्यांना श्वास घेण्यास अडचणी येत आहेत, अशा रुग्णांना ऑक्सिजन देण्यासाठी या ‘व्हेंटिलेटर’चा उपयोग केला जात आहे. या अत्याधुनिक ‘व्हेंटिलेटर’चे वैशिष्ट्ये म्हणजे याद्वारे गरजू रुग्णांना १०० टक्क्यांपर्यंत प्राणवायू (ऑक्सिजन) देण्याची सुविधा यामध्ये आहे. त्याचबरोबर प्राणवायू दाब आवश्यकतेनुसार कमी-जास्त करण्याची सुविधा सदर ‘व्हेंटिलेटर’ मध्ये असून नळीद्वारे थेट फुप्फुसांपर्यंत ऑक्सिजन देण्याची सुविधा देखील यात आहे. तसेच ‘नॉन इन्व्हेझिव्ह मास्क’ पद्धतीने ऑक्सिजन देण्याची सुविधा या ‘व्हेंटिलेटर’मध्ये आहे, अशीही माहिती डॉ. जोशी यांनी या निमित्ताने दिली आहे. आजवर अशाप्रकारे व्हेंटिलेटर हे दिले जातात, परंतु महापालिकेकडे असलेल्या अद्ययावत पध्दतीचे व्हेंटिलेटर बच्चन यांनी दिल्यामुळे महापालिकेच्या या रुग्णालयातील व्हेंटिलेटरची क्षमता वाढलेली आहे. काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी महापालिकेला सिवर लाईन स्वच्छ करणारे वाहन दिले होते. अंधेरी पश्चिम येथील के पश्चिम विभागाचे तत्कालिन सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी या वाहनाचा स्वीकार केला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.