Crime Branch चे पोलीस असल्याचे सांगून वकिलाला लुटले; ५ जणांच्या टोळीला अटक

390

पोलीस असल्याची बतावणी करून एका वकीलाची पाच लाख रुपयांची लूट करणाऱ्या टोळीला अखेर अटक करण्यात आली आहे. खार पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपीपैकी दोघे जण सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मुंबई ठाण्यात ८ गुन्हे दाखल असल्याची माहिती परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

संदेश दत्ताराम मालाडकर (५१), प्रफुल्ल शंकर मोरे (४६), विकास श्रीधर सुर्वे (३९), चेतन कम्पे गोंडा (३४) आणि दर्शन महेश यागनिक (४३) असे अटक करण्यात आलेल्या पाच जणांच्या टोळीचे नाव असून या टोळीत आणखी आरोपी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. संदेश आणि प्रफुल्ल हे दोघे या टोळीचे प्रमुख असून त्यांच्यावर मुंबईतील भोईवाडा, मालाड, दहिसर, नवघर तसेच नवी मुंबईतील रबाळे, सीबीडी बेलापूर, खान्डेश्वर आणि ठाण्यातील मानपाडा पोलीस ठाण्यात चोरी, फसवणूक, खंडणी, धमकी आणि जबरी चोरीचे ८  गुन्हे दाखल आहेत.

police 1 1

वांद्रे पश्चिम येथे राहणारे या गुन्ह्यातील तक्रारदार व्यवसायाने वकील आहे, ८ सप्टेंबर रोजी ते बँकेत पाच लाख रुपयांची रोख रक्कम भरण्यासाठी जात असताना त्यांच्या पाळतीवर असणाऱ्या या टोळीने खार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील  बॉम्बे सॅलड, १६ वा रोड, येथील कॅनरा बँकेंच्या गेटवर तक्रारदार वकिलाला अडवुन आम्ही क्राईम ब्रँचमधून आलो आहे, तुम्हाला चौकशीकामी क्राईम ब्रँचला येथे घेऊन जात असल्याचे सांगून त्याला एका खाजगी वाहनात बसवून वांद्रे परिसरात फिरवले, त्यानंतर त्याच्या जवळील पैशांची बॅग घेऊन तक्रारदार याला सांताक्रूझ एस.व्ही. रोडवर सोडून पाच लाख रुपयांची रोकड घेऊन पळून गेले.

(हेही वाचा आरक्षणविरोधी राहुल गांधी आणि कॉंग्रेसचा खरा चेहरा उघड; Ashish Shelar यांचा आरोप)

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने खार पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. खार पोलिसांनी याप्रकरणी ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. पोलीस उपायुक्त (परिमंडळ ९) राजतिलक रोशन, सहाय्यक पोलिस आयुक्त अधिकराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ, पोलीस निरीक्षक वैभव काटकर, गुन्हा प्रकटीकरण पथकाचे सपोनि. दत्ता कोकणे पोउनि. संदीप गवळी आणि पथकाने या टोळीच्या शोधात वांद्रे, खार आणि सांताक्रूझ परिसरातील जवळपास ६० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यातील मुख्य आरोपी संदेश मालाडकर याची खबऱ्यामार्फत ओळख पटविण्यात आली.

खार पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा प्रकटीकरण पथकाचे सपोनि. दत्ता कोकणे, संदीप गवळी आणि पथकाने मालाडकर याचा माग काढून त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन अटक करण्यात आली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या साथीदारांची नावे सांगितली. पोलीस पथकाने मुंबई तसेच ठाण्यातील विविध परिसरातून इतर ४ आरोपीना अटक करून त्याच्याकडून ३ लाख ३० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी दिली आहे.

अटक करण्यात आलेले मालाडकर आणि मोरे हे दोघे उच्च शिक्षित असून त्यांच्यावर मुंबईसह परिसरात ८ पेक्षा अधिक गुन्हे आहे. हे दोघे दहिसरच्या एका गुन्ह्यात एकत्र आले व त्यानंतर त्यांनी गुन्ह्याची मालिका सुरू केली होती. हॉटेलमध्ये काम करणारे तसेच डिलिव्हरी बॉय यांना पैशांची अमिश दाखवून हे दोघे सामान्य कुटूंबातील तरुणांना गुन्ह्यात लोटले होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वकीलाकडे एवढी रक्कम असल्याची खबर वकिलाच्या जवळच्या व्यक्तीने आरोपीना दिली होती, त्याचा शोध घेण्यात येत आहे, तसेच  या गुन्ह्यात कलमात वाढ करण्यात आली असून जबरी चोरी आणि संघटित गुन्हेगारीचे कलम गुन्ह्यात वाढविण्यात आले असल्याची माहिती धुमाळ यांनी दिली आहे.अटक आरोपीना १८ सप्टेंबर पर्यत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.