लोकलचे खचाखच भरलेले डबे, बाहेर लोंबकळणारे प्रवासी, प्लॅटफॉर्मवरची प्रचंड गर्दी हे दृश्य मुंबईत नवीन नाही. मुंबईकरांच्या प्रवासाविषयी चर्चा अनेकदा होते, मात्र त्यावर कृती कमीच होते. मुंबईकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठीच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी १४ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाऱ्या अंबरनाथ लोकलच्या सेकंड क्लास डब्यातून प्रवास केला. या वेळी त्यांनी प्रवाशांच्या अडचणी जाणून घेतल्या.
मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विक्रोळी असा लोकलने प्रवास करत प्रवाशांशी संवाद साधला. या वेळी अनेक प्रवाशांनी त्यांच्या रोजच्या प्रवासाचे अनुभव मंत्री महोदयांना कथन केले. तसेच तक्रारींचा पाढाही वाचला. स्वत: मंत्रीच प्रवास करत असल्याचे निमित्त साधत काही उत्साही प्रवाशांनी त्यांच्याबरोबर सेल्फीही काढला. वैष्णव यांनीही लोकल प्रवाशांचे रोजचे अनुभव ऐकून घेत रेल्वेच्या कारभारात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. विक्रोळीला उतरून त्यांनी गणपतीचे दर्शन घेतले.
पत्रकारांशी बोलताना वैष्णव (Ashwini Vaishnav) म्हणाले, लोकल सेवा सुधारण्यासाठी महामुंबईतील १२ प्रकल्पांच्या माध्यमातून १६ हजार कोटींच्या ३०३ किमीच्या नव्या मार्गिका उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर रेल्वेच्या क्षमतेसह सेवांमध्ये वाढ करण्यासाठी मदत होणार आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलचा प्रवास सुसह्य करण्यासाठी नव्या मार्गिका उभारण्याच्या कामाला गती देण्यात येत आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत जीवनवाहिनी म्हणून धावत असलेल्या मुंबई लोकलचा विस्तार करण्यात येणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community