ईद-ए-मिलाद सणानिमित्त मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यात सोमवारी १६ सप्टेंबर २०२४ रोजी पूर्वी घोषित केलेली ईद-ए-मिलाद सणाची सार्वजनिक सुटी महाराष्ट्र शासनाकडून रद्द करण्यात आली आहे. त्या ऐवजी बुधवारी १८ सप्टेंबर २०२४ या दिवशी ईद-ए-मिलाद (Eid-e-Milad) सणानिमित्त सार्वजनिक सुटी शासनाने जाहीर केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारपर्यंत सुट्टी टाकून कोंकणात गावी गेलेल्या आणि पुढील चार दिवसांच्या सुट्टीचा लाभ घेणाऱ्या तसेच या चार दिवसांच्या सुट्टीच्या निमित्ताने बाहेर जाण्याचे नियोजन करणाऱ्या कर्मचाऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे सोमवारी कामावर या नाही तर सोमवारी सुट्टी घेऊन पाच दिवसांच्या सुट्टीवर पाणी सोडा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सार्वजनिक सुटीतील हा बदल महाराष्ट्र शासनाने अधिसूचना प्रसिद्ध करून जाहीर केला आहे. त्याआधारे, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाने देखील ईद-ए-मिलाद (Eid-e-Milad) सणानिमित्त सोमवारी १६ सप्टेंबर २०२४ रोजीची सुटी रद्द करून त्याऐवजी बुधवारी १८ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. सुटीतील या बदलामुळे आता सोमवारी १६ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई महानगरपालिकेची (BMC) सर्व कार्यालये नियमितपणे सुरू राहणार आहेत. त्याचप्रमाणे, सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील.
(हेही वाचा – ज्येष्ठ पत्रकार Vijay Vaidya यांचे दुःखद निधन ; ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)
ईद-ए-मिलाद (Eid-e-Milad) सणानिमित्त, बुधवारी १८ सप्टेंबर रोजी, मुंबई महानगरातील मुंबई महानगरपालिकेची सर्व कार्यालये, तसेच ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिकेची कार्यालये यांना (सफाई, रुग्णालये, दवाखाने, प्रसूतिगृहे, जलकामे, विद्युत धुलाई केंद्र, अग्निशमन, उदंचन केंद्र, सुरक्षा, देवनार पशुवधगृह, आपत्कालीन व्यवस्थापन या अत्यावश्यक सेवा वगळून) सार्वजनिक सुटी राहील, असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.
ही सुट्टी शासनाने बदलण्याचा निर्णय घेतल्याने तसेच याची अंमलबजावणी महापालिकेच्यावतीने करण्यात आल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. गणेशोत्सवाकरता अनेक महापालिकेचे कर्मचारी हे गणपतीला गावी गेले. त्यामुळे त्यांनी आपली सुट्टी शुक्रवारपर्यंत मंजूर करून घेतली होती. शुक्रवारपर्यंत ही सुट्टी मंजूर करून पुढील मंगळवारपर्यंतच्या सुट्टीचा ते लाभ घेणार होते. म्हणजे सुट्टीला जोडून चार दिवसांच्या सुट्टीचा लाभ घेण्याचा प्रयत्न होता. परंतु शासनाने ईड निमित्त जाहीर झालेली सुट्टी बदल्याने कर्मचाऱ्यांच्या सुट्टीचा बोऱ्याच वाजला गेला आहे.
कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जे कर्मचारी शुक्रवारपर्यंत सुट्टी मंजूर करून पुढील चार दिवसांच्या सुट्टीचा लाभ घेणार होते, त्यांना आता सोमवारी कामावर रुजू व्हावे लागेल. जर ते सोमवारी न येता थेट गुरुवारी सेवेत रुजू झाल्यास त्यांच्या नावे पाच दिवसांची सुट्टी लागेल. जर सोमवारी सेवेत रुजू झाल्यास त्यांना शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचाही लाभ मिळेल आणि मंगळवार व बुधवारच्याही सुट्टीचा. परंतु यामुळे गावाला गेलेल्या किंवा या सुट्टीचे नियोजन करून बाहेर फिरायला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community