Maharashtra Politics : भाजपाला जिंकवणे हेच हिंदुंचे कर्तव्य आहे का?

180
Maharashtra Politics : भाजपाला जिंकवणे हेच हिंदुंचे कर्तव्य आहे का?
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

भारतामध्ये हिंदुंइतका गोंधळलेला समाज दुसरा नाही. सर्वसाधारण हिंदुंना त्यांचे मूळ ध्येय ठाऊक नसल्यामुळे ते एकतर हिंदुत्वापासून दूर जातात किंवा त्यांच्यात राजकीय गोंधळ दिसून येतो. शिवसेना की भाजपा की मनसे? कोणाची बाजू मांडायची असा प्रश्न हिंदुंना पडतो. काही राजकीय समर्थक तर त्या त्या राजकीय पक्षांनी (विशेषतः भाजपाने) आपल्याला जे जे हवे ते ते सर्व केले पाहिजे असा अट्टाहास लावून बसतात. मग त्यांच्या पदरात निराशा पडते. मग ते त्या हिंदुत्ववादी राजकीय पक्षाचे विरोधक बनतात आणि त्या पक्षाला पाडण्यासाठी प्रचार करु लागतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जाणून न घेतल्यामुळे हा गोंधळ हिंदुंमध्ये निर्माण होतो. त्यामुळे हिंदुंचे कर्तव्य काय आहे हे आपल्याला आधी समजून घ्यावे लागेल. (Maharashtra Politics)

(हेही वाचा – Mumbai Local : मुंबईकरांना मोठा दिलासा; तीन वर्षांत लोकल ट्रेन फेऱ्या होणार दुप्पट)

हिंदुस्थान पितृभू आणि पुण्यभू

मुसलमान आणि ख्रिस्त्यांना जगभरात अनेक भूमी आहे, अनेक देश आहेत. पण हिंदुंचा हक्काचा एकच देश आहे, हिंदुस्थान. ही आपली पितृभू आणि पुण्यभू देखील आहे. या भूमीच्या रक्षणासाठी आपल्या पूर्वजांनी प्राणार्पण केलेले आहे. या भूमीचे कल्याण व्हावे म्हणून अनेक परंपरा निर्माण केल्या. हा हिंदुस्थान आपला आहे, हिंदुंचा आहे आणि हिंदू सहिष्णू, सज्जन व सोज्वळ असल्यामुळे इथे इतर धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. कॉंग्रेसची स्थापना होण्याआधी या देशावर अनेक आक्रमणे झाली. पण हिंदुंनी सर्वांशी दोन हात केले. वाळवंटी जिहादी प्रदेशातून दीर्घकाळ आक्रमण झाले. त्यामुळे आपल्या मनातली स्वातंत्र्याची भावना हळूहळू लोप पावू लागली. तेव्हा सह्याद्रीचा नृसिंह म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदुंच्या मनात पुन्हा स्वातंत्र्याची ज्योत पेटवली आणि स्वराज्य निर्माण करुन दाखवले. पुढे मराठी माणसाने हे स्वराज्य वाढवले आणि जिहाद्यांना पळवून लावून देश स्वतंत्र केला. इंग्रजांविरुद्धही आपण प्राणपणाने लढलो मात्र १८५७ नंतर या देशावर इंग्रजांनी राज्य स्थापन केलं. इंग्रजांना हिंदुंची इतकी भीती वाटत होती की यापुढे ते हिंदुंशी कधी शस्त्राने लढले नाहीत, त्यांनी खोटी लोकशाही स्थापन केली. कॉंग्रेस स्थापना याच कारणासाठी झाली की हिंदुंनी इंग्रजांवर शस्त्रे उगारु नयेत. पण शिवाजी माहाराज हे आपले आदर्श असल्यामुळे आपण इंग्रजांशी सशस्त्र लढा सुरुच ठेवला. (Maharashtra Politics)

(हेही वाचा – PUNE Metro : पुणे मेट्रोत एका दिवसात दोन लाख लोकांनी केला प्रवास)

हिंदुत्वाचे दुसरे नाव मानवता!

नेहरु प्रभृती नेत्यांना मात्र शिवाजी महाराज नको होते. आजही त्यांच्या वारसदारांना शिवाजी महाराज नकोत. कारण त्यांना त्यांचे वर्चस्व स्थापन करायचे होते. म्हणून स्वातंत्र्य लढ्याच्या केंद्रस्थानी ते राहतील याची काळजी त्यांनी घेतली. हिंदु समाज दोन विचारांत विभागला गेला, १. कॉंग्रेसवादी (छद्म अहिंसावादी) आणि २. सावरकरवादी (स्वराज्यवादी – म्हणजेच शिवरायांच्या तत्वांनुसार चालणारे). हा संघर्ष आजही कायम आहे. इथे कॉंग्रेस पुरस्कृत डाव्यांचे वर्चस्व असणार की शिवरायांच्या तत्वांनी चालणाऱ्या हिंदुंचे वर्चस्व असणार, हा मूळ संघर्ष आहे. यामध्ये जिहादी, डीप स्टेट, बाह्य शक्ती देखील समाविष्ट आहेत. या संघर्षात राष्ट्रीय स्तरावर भाजपा ही केवळ एक राजकीय शक्ती आहे. ज्याप्रमाणे डावे, मुसलमान आणि इतर छद्म अहिंसावादी समाज कोणताही विचार न करता भाजपला विरोध करुन कॉंग्रेस व हिंदू विरोधी शक्तीला निवडणुकीत सहकार्य करतो त्याप्रमाणे हिंदुंनी डोळे बंद करुन सगळे मतभेद वगैरे विसरुन हिंदुंची राजकीय शक्ती भाजपा व युतीला सहकार्य केले पाहिजे. पण हा एक भाग झाला. (Maharashtra Politics)

भाजपा ही राजकीय संघटना आहे म्हणून त्यांचा राजकीय स्वार्थ असणे स्वाभाविक आहे. तसेच आपल्याला जे हवे, ते सगळेच भाजपा करु शकत नाही. म्हणून प्रत्येक क्षेत्रात हिंदुंभावविश्वाचे वर्चस्व असायला हवे. कला, बौद्धिक, शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रात हिंदुभावविश्व रुजले पाहिजे. उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे असा प्रश्न हिंदुंना पडताच कामा नये. पुढील २५-३० वर्षे हिंदुंनी केवळ हिंदुत्व एवढेच पाहिले पाहिजे. लक्षात घ्या, एखादा ज्यू माणूस जेव्हा देवाघरी जात असतो, तेव्हा तो आपल्या मुलांना जवळ बोलवतो आणि सांगतो की ‘काहीही विसरलात तरी चालेल. पण तुम्ही ज्यू आहात हे विसरु नका.’ म्हणूनच तर हजारो वर्षांनंतर ज्यू लोकांना इस्रायल नावाचे राष्ट्र स्थापन करता आले. ही चिकाटी आपल्याला हवी आहे. पुढील २५-३० वर्षे केवळ आणि केवळ हिंदुत्व. हिंदुत्व रुजले तर पुढे जाऊन त्याचे मोठे वृक्ष होईल आणि त्या वृक्षाला मानवतेची फळे लागलेली असतील. कारण हिंदुत्वाचे दुसरे नाव मानवता आहे. हे आपले मूळ कर्तव्य आहे! (Maharashtra Politics)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.