Rahul Gandhi यांचा अमेरिका दौरा महायुतीसाठी लाभदायक?

महायुतीने षटकार नाही मारले तर कठीण! . निवडणुकीसाठी एक ना अनेक मुद्दे महायुतीला मिळाले.

143
Rahul Gandhi यांचा अमेरिका दौरा महायुतीसाठी लाभदायक?
  • सुजित महामुलकर

क्रिकेट सामना जिंकण्यासाठी ३६ धावांची गरज आहे आणि विरोधी संघातील गोलंदाजाने शेवटच्या शटकात सहापैकी सहा चेंडू फुल टॉस दिले आणि त्यावर फलंदाजाने षटकार नाही मारले तर जिंकण्याची संधी हुकली. असेच काहीसे सध्या राजकारणात झाल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राज्यातील महायुतीला अमेरिकेतून फुल टॉस चेंडू दिले आहेत, आता जर महायुतीला षटकार नाही मारता आले तर लोकसभा निवडणूक सामना राज्यात गमवाला, तशी परिस्थिती विधानसभा निवडणुकीतही होऊ शकते.

(हेही वाचा – Arvind Kejriwal यांची मोठी घोषणा, म्हणाले- येत्या दोन दिवसांनी…)

‘एमएमआर’ची भूमिका महत्त्वाची

लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ जागांपैकी महायुतीला केवळ १७ जागा मिळवता आल्या तर विरोधी महाविकास आघाडीने ३१ जागा पटकावल्या. आता विधानसभा निवडणूक काही दिवसांवरच आली आहे. राज्यातील २८८ मतदार संघांपैकी ६० जागा मुंबई महानगर प्रदेश (MMR) क्षेत्रात असून या ६० जागा भविष्यातील महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, हे विसरून चालणार नाही. २८८ पैकी सरकार स्थापन करण्यास १४४ चा मॅजिक फिगर गाठणे क्रमप्राप्त आहे. भाजपा-शिवसेना (शिंदे) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला या ६० पैकी जास्तीत जास्त जागा जिंकणे आवश्यक आहे. त्या मिळवल्या तर राज्यातील सत्ता स्थापन करण्यास फार कसरत करावी लागेल, असे वाटत नाही.

तीन दिवसीय अमेरिका दौरा

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नुकताच तीन दिवसीय अमेरिका दौरा केला. या दौऱ्यावर असताना गांधी यांनी एकावर एक फुल टॉस चेंडू दिले आहेत. गेल्या मंगळवारी १० सप्टेंबर २०२४ ला वॉशिंग्टन डीसी येथील जॉर्जटाउन विद्यापीठातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधत असताना गांधी यांनी आरक्षणावर भाष्य केले. ते म्हणाले की, “भारत हे सामाजिकदृष्ट्या अनुकूल राष्ट्र झाल्यानंतर काँग्रेस पक्ष आरक्षण संपवण्याचा विचार करेल.” आता प्रश्न निर्माण होतो की सामाजिकदृष्ट्या अनुकूल राष्ट्र कधी आणि कसे होणार?

(हेही वाचा – PUNE Metro : पुणे मेट्रोत एका दिवसात दोन लाख लोकांनी केला प्रवास)

मुलाखतीची व्हिडिओ क्लिप घरोघरी

एकीकडे राहुल गांधी (Rahul Gandhi) लोकसभेत जातनिहाय जनगणना करण्याची जोरदार मागणी करत आहेत. देशाचा अर्थसंकल्प बनवण्यात किती ओबीसी, दलित, आदिवासी समाजाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग होता, असे बालिश प्रश्न लोकसभेत विचारणारे काँग्रेस नेते ‘भारत समाजिकदृष्ट्या अनुकूल राष्ट्र झाल्यानंतर काँग्रेस पक्ष आरक्षण संपवण्याचा विचार करेल’ असे म्हणतात. भाजपाने या विधानावर आक्षेप घेत आंदोलने सुरू केली आहेत आणि त्याची तीव्रता निवडणुकीपर्यंत तरी टिकवणे गरजेचे आहे. गांधी यांनी तात्काळ दुसऱ्याच दिवशी ‘माझ्या बोलण्याचा विपर्यास केला जात आहे’ असे स्पष्टीकरण दिले. मात्र गांधी यांच्या मुलाखतीची व्हिडिओ क्लिप तोपर्यंत भारतातील गावागावात आणि घरोघरी पोहोचली होती.

… म्हणून घटक पक्षांच्या कुबड्या लागल्या

लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपाच्या एका नेत्याने अतिउत्साहात ‘संविधान बदलण्यासाठी ४०० पार’चा नारा देण्यात आल्याचे जाहीर भाषणात सांगितले. त्यात किती तथ्य होते ते केंद्रीय नेतृत्वालाच माहीत. पण काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी त्याचे भांडवल करत, भाजपाचे ४०० पेक्षा अधिक खासदार निवडून आले तर ते संविधान बदलणार, ज्यामुळे देशाचे स्वातंत्र्य धोक्यात येईल, असा नॅरेटिव्ह लोकांच्या मनात पक्का करण्यात बऱ्याच अंशी यश मिळवले. त्याचे परिणाम पुढे लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळालेच. सगळ्यात जास्त नुकसान भाजपाचेच झाले. केंद्रात भाजपाला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी घटक पक्षांच्या कुबड्या घ्याव्या लागल्या.

(हेही वाचा – Vasaicha Raja : ‘वसईचा राजा’ गणेशोत्सव मंडळाच्या नैवेद्य स्पर्धा आणि सामूहिक अथर्वशीर्ष पठाणाच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद)

स्वतःच्या पायावर आणखी एक धोंडा

अखेर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना स्वतःला त्यांचे राजकीय गुरु आणि इंडियन ओव्हरसीझ काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोडा यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या मदतीला धावून यावे लागले, असेच म्हणावे लागेल. गांधी यांनी आरक्षण रद्द करण्याशिवाय भारतातील शीख समाजाबाबत केलेले विधान आणि इल्हान ओमर यांची भेट घेऊन भाजपाच्या हातात आयते कोलीत दिले. भारतात शीख समाजाला पगडी आणि कडा घालण्यास रोखले जाते, असे बोलून स्वतःच्या पायावर आणखी एक धोंडा मारून घेतला. इतकेच नाही तर काश्मीरबाबत कायम भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या अमेरिकी कायदेमंडळाचे सदस्य इल्हान ओमर यांची राहुल गांधी यांनी भेट घेतली.

…तर परीक्षार्थीचा अति आत्मविश्वास, आळस नडला  

असे एक ना अनेक मुद्दे भाजपाच्या हाती देण्यात आले आहेत. थोडक्यात सांगायचे तर परीक्षेला जाण्यापूर्वी पेपर फुटला आणि अभ्यासासाठीही पुरेसा वेळ असून जर उत्तीर्ण होता आले नाही तर परीक्षार्थीचा अति आत्मविश्वास किंवा आळसपणा नडला, असेच म्हणावे लागेल. दैव देतं आणि कर्म नेतं असं होऊ नये.. हीच अपेक्षा..

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.