राज्यातील कोविड-19ची उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त संस्थेमध्ये अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी फी व्यतिरिक्त इतर शुल्कात 16 हजार 250 रुपयांची(अंदाजे 25 टक्के) सूट देण्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मुंबईत केली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या या घोषणेमुळे राज्यातील तब्बल 20 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मोठा शुल्क दिलासा मिळणार आहे.
आर्थिक अडचणी लक्षात घेऊन निर्णय
सामंत म्हणाले, शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त अभियांत्रिकी संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी (ट्यूशन) शुल्का शिवाय इतर शुल्क भरावे लागते. त्यामध्ये कोविड काळात विद्यार्थी महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित नसल्याने ग्रंथालय, जिमखाना अशा शैक्षणिक सुविधांचा वापर केला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांकडून हे शुल्क घेऊ नये. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक यांच्या अडचणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी म्हणून इतर शुल्का मधील 16 हजार 250 रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे 20 हजार अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.
(हेही वाचाः राज्याचा बारावीचा फॉर्म्युला ‘३०:३०:४०’? ‘त्या’ विद्यार्थ्यांवर होणार अन्याय?)
सद्यस्थितीत हॉटेल मॅनेजमेंट संस्थेअंतर्गत असलेले 30 रुमचे प्रशिक्षण केंद्र ऑडिटोरिअम व बँकेट हॉल वापरण्यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांनी याबाबत सर्व सुविधा नुतनीकरण करुन पंचतारांकित हॉटेल सोबत सामंजस्य करार करावा. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध होईल, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.
वसतिगृहाला मातोश्री नाव
व्हीजेटीआय येथील मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण झाले असल्याने या वसतिगृहास ‘मातोश्री’ या नावाने नामकरण करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच या संस्थाना शिक्षक आणि शिक्षकेत्तर पदे कंत्राटी तत्वावर स्वतःच्या निधीतून भरण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे सामंत यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community