- सचिन धानजी, मुंबई
वांद्रे पश्चिम येथील वांद्रे किल्ल्याने (Bandra Fort) आता कात टाकली आहे. मोडकळीस आलेल्या भिंती, प्रवेशद्वार तसेच खंडर बनलेला हा किल्ला सुशोभित झाला आहे. किल्ल्यावरील भिंतींचे बांधकाम, त्याठिकाणी झाडांचे ताटवे आणि पायऱ्या आणि पायवाटा या विद्युत रोषणाईसह आकर्षक बनल्याने एकप्रकारे हा किल्ला आता खऱ्या अर्थाने पर्यटन स्थळ बनवले जाणार आहे. आजवर या किल्ल्यावर जाण्यासाठी लोक तयार होत नसली तरी नव्याने केलेल्या या सुशोभित कामांमुळे या किल्ल्यावर हजेरी लावल्याशिवाय पर्यटकांची पावले मागे पडणार नाही.
मुंबईतील वरळी किल्ल्याचा जिर्णोध्दार करण्यासाठी स्थानिक आमदार व तत्कालिन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला होता, मात्र, त्याच वेळी वांद्रे किल्ल्याची (Bandra Fort) डागडुजी करून त्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी स्थानिक भाजपाचे आमदार ऍड. आशिष शेलार यांनी पुढाकार घेत यासाठी प्रयत्न केला. त्यानुसार आशिष शेलार यांच्या प्रयत्नानुसार वांद्रे किल्ल्याच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी महापालिका उद्यान विभागाच्यावतीने मंजुरीसाठी जानेवारी २०२० रोजी प्रस्ताव सादर केला.
परंतु शेलार यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून वांद्रे किल्ल्याचे (Bandra Fort) सुशोभीकरण होईल आणि वरळीचा किल्ल्याचे सुशोभीकरण लांबणीवर पडेल या विचाराने महापालिकेतील तत्कालिन सत्ताधारी पक्षाने याला विरोध करत शीव, माहिम, वरळी आदी किल्ल्यांचे एकत्र प्रस्ताव सादर करावे असे कारण देत हा प्रस्ताव फेरविचारासाठी परत पाठवत फेटाळला होता. त्यानंतर हा प्रस्ताव तसाच प्रलंबित ठेवला गेला. त्यानंतर प्रशासक नियुक्त झाल्यानंतर याला मंजुरी देण्यात आली आणि वांद्रे किल्ल्याच्या सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
वांद्रे किल्ल्याच्या (Bandra Fort) सुशोभीकरणाच्या कामामध्ये किल्ल्याच्या मोडकळीस आलेल्या संरक्षक भिंती पाडून, त्या भिंतींची पुनर्बांधणी करणे, प्रवेशद्वार बनवणे, शहरी वन निर्माण करणे आदी कामे केली प्रस्तावित केली होती. या कामासाठी महापालिकेने एपीआय सिव्हीलकोन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आणि यासाठी विविध करांसह २०.६२ कोटीं रुपये खर्च करण्यास मान्यता दिली होती.
त्यानुसार संबंधित कंपनीकडून महापलिकेच्या उद्यान विभागाने या किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आणि आता याचे काम जवळपास ९५ ते ९८ टक्के पूर्ण झाले आहे. आता यात शेवटचा हात फिरवला जात असून या सुशोभीकरणाच्या कामाबाबत खुद्द स्थानिक आमदार आशिष शेलार प्रचंड खूश आहेत. त्यांना अपेक्षित असे किल्ल्यांच्या (Bandra Fort) सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
तसेच चार दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनीही या किल्ल्याच्या सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी केली आहे. त्यामुळे लवकरच या किल्ल्याचे सुशोभीकरण पूर्ण झाल्यानंतर याचे लोकार्पण करून हा किल्ला पर्यटकांसाठी खुला करून दिला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. महापालिकेच्या उद्यान कक्षाने जातीने लक्ष घालून हे काम नियोजित वेळेत पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे लवकर हा सुशोभित वांद्रे किल्ला (Bandra Fort) मुंबईकरांसाठी एक पर्यटन स्थळ ठरणार आहे.
Join Our WhatsApp Community