Assembly Elections : मुख्यमंत्री पदाभोवती राज्याचे राजकारण

43
Assembly Elections : मुख्यमंत्री पदाभोवती राज्याचे राजकारण
Assembly Elections : मुख्यमंत्री पदाभोवती राज्याचे राजकारण
  • सुजित महामुलकर

विधानसभा निवडणूक (Assembly Elections) जसजशी जवळ येऊ लागली तसतशी मुख्यमंत्री पदाची स्वप्ने अनेकांना पडू लागली. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील राजकारण हे ‘मुख्यमंत्री’ या पदाभोवती फिरू लागल्याचे दिसून येत आहे. याची सुरुवात उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये केली. तेव्हापासून सुरू झालेली चर्चा पुढे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यापासून काँग्रेसचे नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि नुकतीच वर्षा गायकवाड यांनी ‘महिला मुख्यमंत्री’ पदापर्यंत आणून ठेवली आहे. लोकहित, सामाजिक बांधिलकी, पायाभूत सुविधा, विकास, शिक्षण, नोकऱ्या, आरोग्य सुविधा अशा विषयांची चर्चा करणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रावर ही वेळ का आणि कशी आली?

ऐतिहासिक विधानसभा  

राज्यातील विधानसभा निवडणूक (Assembly Elections) दीड-दोन महिन्यावर येऊन ठेपली आहे. यापूर्वीपर्यंत पार पडलेल्या कोणत्याच विधानसभा निवडणुकीदरम्यान ‘मुख्यमंत्री’ पदावरून एवढा गहजब झाला नाही. एकूणच या विधानसभेचा हा पाच वर्षाचा कार्यकाळ महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदवला जाईल तो अनेक अर्थांनी. मग त्यात सगळ्यात मोठी गोष्ट असेल ती ही की या कार्यकाळाच्या (टर्म) पाच वर्षांत तीन मुख्यमंत्री झाले, त्यात उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे होते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तीनही मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार उपमुख्यमंत्री राहिले. त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी दोनही पदे एकाच (पाच वर्षाच्या) कार्यकाळात भूषवणारे देवेंद्र फडणवीस यांचीही इतिहासात नोंद होईल.

(हेही वाचा – Ganesh Visarjan Boat Accident : वर्सोवा येथे अंधेरीच्या राजाच्या विसर्जनावेळी उलटली बोट)

२०१९ च्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला राज्यातील जनतेने स्पष्ट बहुमत दिले असतानाही उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी असलेली युती तोडून पारंपारिक विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एकसंघ) यांच्याशी ‘हात’मिळवणी करत मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतले. दुर्दैवाने तीन-चार महिन्यातच कोरोनाचे जागतिक संकट ओढवले. त्यामुळे ठाकरे यांना त्यांच्या कामाचा ‘आवाका’ जनतेत मिसळून दाखवता आला नाही. साधारण अडीच वर्षाच्या त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या भेटीही त्यांनी मंत्रालयाला दिल्या नाहीत आणि बराचसा काळ हा घरी बसून, व्हिडिओ कॉन्फ्रेंसद्वारे बैठका, फेसबुकद्वारे संवाद असाच काढला.

म्हणूनच कदाचित आता ‘ती’ राहिलेली कसर भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडीकडे ‘मुख्यमंत्री पदाचा चेहेरा घोषित करावा’ असा आग्रह धरला असावा. एकदा नव्हे तर वारंवार यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी पाठपुरावा करूनही राजकारण कोळून प्यायलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षांनी त्यांना दाद दिली नाही. आता काँग्रेसनेही ‘ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री’ हेच सूत्र असल्याचे एकदा सांगितले. गुरुवारी तर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार असे सांगून ठाकरे यांना चपराक दिली. तर शरद पवार यांच्या मनात त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्याची इच्छा असल्याचे बोलले जात आहे मात्र ‘निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतला जाईल’ असे सांगत तेही वेळ मारून नेत आहेत.

(हेही वाचा – चुकून जरी गोळी आली, तर आम्ही…Amit Shah यांचा पाकिस्तानला इशारा)

उबाठाच्या जखमेवर मीठ

चार दिवसांपूर्वी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष आणि नुकत्याच लोकसभेत गेलेल्या वर्षा गायकवाड यांनादेखील मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यांनी आपली सुप्त इच्छा न लपवता स्पष्ट बोलून दाखवली, भले त्यांनी त्यासाठी ‘महिला कार्ड’ वापरत काँग्रेसच्या अन्य काही महिला नेत्या, सुप्रिया सुळे आणि रश्मी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत शिवसेना उबाठाच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळले. त्यावर अन्य कुणी पाठिंबा देणे किंवा विरोध करण्याआधी शिवसेना उबाठा नेत्या किशोरी पेडणेकर यांनी तात्काळ रश्मी ठाकरे या राजकारणात नाहीत असे स्पष्टीकरण देत ‘कारण नसताना रश्मी ठाकरे यांचे नाव घेऊ नये’, असा अप्रत्यक्ष दम काँग्रेसला भरला.

यावर राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले, “केवळ महिला म्हणून नाही तर मुख्यमंत्री पद सांभाळण्याची क्षमता आहे का? हे पाहावे.” तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी म्हटले, “केवळ महिला मुख्यमंत्री झाली म्हणजे जनतेचे प्रश्न सुटले, असे होणार नाही. तर सक्षमपणे प्रशासन सांभाळणारी व्यक्ती त्या पदावर असावी.”

…एवढीच अपेक्षा

या दोन्ही प्रतिक्रिया राज्यातील महिलांच्या प्रातिनिधिक असायला हव्यात. क्षमता, कर्तृत्व नसताना केवळ महिला म्हणून त्यांना राज्याच्या सर्वोच्च पदावर बसवले तर राज्यातील समस्त महिलांना ते आवडेल का, अशी शंका आहे. त्यामुळे महिला असो वा पुरुष, कुशल, कार्यक्षम, संवेदनशील, राज्याचा आलेख उंचवणारा आणि जनतेत मिसळणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळावा, हीच अपेक्षा..

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.