माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी शुक्रवारी ईडीने पुन्हा एकदा छापेमारी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांकडून देशमुखांच्या घरावर धाड सत्र सुरू आहे. शुक्रवारी झालेल्या या छापेमारीनंतर त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्याच्या माजी गृहमंत्र्यांवर इतकी मोठी कारवाई होत असल्याची ही साधारण पहिलीच घटना असल्याने, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पण या सर्व प्रकरणाचा सुरुवातीपासून आतापर्यंतचा नेमका घटनाक्रम कसा होता, त्याची पूर्ण माहिती जाणून घेऊया…
अशी झाली सुरुवात
अंबानींच्या घरासमोर सापडलेली स्फोटकांनी भरलेली कार आणि त्याचा मालक मनसुख हिरेन याची हत्या, यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरुन राज्य सरकारवर अनेक आरोप करण्यात आले. या प्रकरणात पोलिस दलात प्रभारी अधिकारी असलेल्या सचिन वाझेभोवती संशयाचे वादळ घोंगावू लागल्याने, राज्यात वेगाने घडामोडी घडल्या. मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडून काही अक्षम्य चूका झाल्या असल्याचे सांगत, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर यांची मुंबई पोलिस आयुक्त पदावरुन उचलबांगडी केली. त्यानंतर परमबीर सिंग यांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 20 मार्च 2021 रोजी पत्र लिहित अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले.
(हेही वाचाः परमबीर सिंग यांच्याकडून अक्षम्य चूक! – अनिल देशमुख )
परमबीरांचा ‘लेटरबाँब’
सचिन वाझेला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या ज्ञानेश्वर या शासकीय निवासस्थानी गेल्या काही महिन्यांत वारंवार बोलावून घेतले. फेब्रुवारीच्या दरम्यान या भेटी गृहमंत्री आणि वाझे यांच्यात झाल्या. या भेटीत अनिल देशमुख यांनी वाझेला वसुली करण्याचे टार्गेट दिले होते. दर महिन्याला किमान १०० कोटी रुपये वसूल करुन द्यावेत, असे देशमुखांनी वाझेला सांगितले होते. मुंबईतील १ हजार ७५० बार आणि रेस्टॉरंटकडून प्रत्येकी २ ते ३ लाख रुपये वसूल करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी वाझेला दिले असल्याचे, या पत्रात परमबीर सिंग यांनी म्हटले. या लेटर बॉम्बनंतर गृहमंत्री चांगलेच अनिल देशमुख अडचणीत आले. त्यांनी आपल्यावरील हे आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला.
(हेही वाचाः परमबीर सिंग यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र… गृहमंत्र्यांवर केले धक्कादायक आरोप!)
चांदीवाल समिती गठीत
या आरोपांनंतर ठाकरे सरकार चांगलेच हादरले. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी सातत्याने केली. त्यामुळे या आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय 30 मार्च 2021रोजी घेतला. त्यासाठी सरकारने मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली.
अखेर दिला राजीनामा
अनिल देशमुखांवरील आरोपांची केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी करण्यात यावी, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. 5 एप्रिल रोजी यावर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश देऊन, 15 दिवसांच्या आत चौकशीचा अहवाल सादरल करण्यास सांगितले. त्यामुळे अनिल देशमुख यांना चांगलाच धक्का बसला. त्यानंतर त्याच दिवशी त्यांनी सिल्व्हर ओकवर शरद पवार यांची भेट घेऊन सीबीआय चौकशी चालू असताना आपण पदावर राहू इच्छित नाही, असे सांगितले. यासाठी पवारांनी संमती दिल्यानंतर देशमुखांनी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला.
(हेही वाचाः अखेर अनिल देशमुख यांनी दिला राजीनामा!)
सर्वोच्च न्यायालयातही नाही दिलासा
आपली बाजू ऐकून न घेताच आपली सीबीआय चौकशी होत आहे, असे सांगत अनिल देशमुख यांनी ही चौकशी टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण गृहमंत्र्यांवर त्यांच्याच विभागातील पोलिस आयुक्तांनी आरोप केल्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी होणे, योग्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 8 एप्रिल रोजी दिला.
(हेही वाचाः आता देशमुखांची सीबीआय चौकशी होणार… काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय?)
पहिली छापेमारी
सीबीआयने केलेल्या 11 तासांच्या चौकशीत अनिल देशमुख यांनी मला काही माहीत नाही, असे सांगत आपल्यावरील आरोप फेटाळले. त्यानंतर 24 एप्रिल रोजी सीबीआयने त्यांच्या नागपूर आणि मुंबई येथील घरांवर छापेमारी केली. या छापेमारीत सीबीआयने लॅपटॉप आणि काही फाईल्स ताब्यात घेतल्या.
(हेही वाचाः अनिल देशमुखांच्या घरी सीबीआयची धाड! लॅपटॉप, फाईल्स ताब्यात घेतल्या! )
ईडीचा ससेमिरा
सीबीआयनंतर देशमुख यांच्या मागे ईडीच्याही चौकशीचा ससेमिरा लागला. ईडीने मनी लॉन्डरिंग प्रकरणी अनिल देशमुख आणि त्यांच्या दोन्ही मुलांची चौकशी करण्यासाठी 11 मे रोजी गुन्हा दाखल केला होता. 25 जून रोजी सकाळी पुन्हा एकदा ईडीने देशमुखांच्या नागपूर येथील घरी छापा मारला आहे. आता देशमुखांवर मोठी कारवाई होणार असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशा कारवाईसाठी दिल्लीत बैठक पार पडली असून, त्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ही कारवाई काय असणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
(हेही वाचाः अनिल देशमुखांच्या घरावर पुन्हा ईडीची छापेमारी )
Join Our WhatsApp Community