सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील (Rajkot Fort) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेनंतर या ठिकाणी महाराजांचा नवीन पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कणकवली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन पुतळा उभारण्यासाठी नविदा प्रक्रिया राबवली असून सुमारे २० कोटी खर्च करण्याची योजना आहे. तसेच पुतळा उभारल्यानंतर तो १०० वर्षे टिकेल, अशी अट निविदेत टाकली आहे.
नौदल दिनानिमित्त मालवणच्या राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) छत्रपती शिवाजी महाराजांचा २८ फुटी पुतळा उभारला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. मात्र अवघ्या आठ महिन्यानंतर म्हणजेच २६ ऑगस्ट रोजी शिवरायांचा पुतळा कोसळला. या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली. पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे फरार झाला. विरोधकांनी त्यावरून सरकारला धारेवर धरले. तसेच पुतळा उभारणीच्या कामात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत जोरदार टीकास्त्र सोडले. शिवप्रेमी आणि विरोधकांच्या टिकेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माफी मागावी लागली. दरम्यान, लवकरच राजकोट किल्ल्यावर नवीन पुतळा उभारणार अशी घोषणा सरकारने केली होती. त्याकरिता समितीही स्थापन केली. त्यानुसार नवीन पुतळा उभारण्यासाठी कणकवली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभाग कार्यकारी अभियंत्यांनी निविदा प्रक्रीया सुरु केली आहे.
पुतळ्याचे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्याची मुदत
राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याची उंची साठ फूट असून पुतळ्याचे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्याची मुदत निविदेत देण्यात आली आहे. निविदांमधील अटींनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती यासाठी सुमारे वीस कोटी रुपये खर्च गृहित धरण्यात आला आहे. निविदेत पात्र ठरणाऱ्या कंत्राटदाराला पुढील दहा वर्षे पुतळ्याची देखभाल करावी लागणार आहे. आयआयटी पवईच्या मार्गदर्शनाखाली तसेच अनुभवी शिल्पकाराला हा पुतळा उभारण्याचे काम देण्यात येईल अशी अट घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्षात पुतळा उभारण्याच्या कामाला सुरवात करण्यापूर्वी तीन फुटांचे फायबर मॉडेल तयार करून त्याला कला संचालनालयाकडून मंजूरी घ्यावी लागणार आहे. ती मंजूरी मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
Join Our WhatsApp Community