- प्रतिनिधी
काळाचौकी पोलिसांनी लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक केलेला २२ वर्षीय आरोपीचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला आहे. आर्थर रोड तुरुंगात असताना आरोपीला फिट आल्याने त्याला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला आहे. संशयास्पद मृत्यू असल्याचा आरोप आरोपीच्या कुटुंबियांनी केला असून मृत्यूची चौकशी करण्यात यावी अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १६ वर्षाच्या मुलीचा २२ वर्षांचा आरोपी आरिफ मेहबूब कुरेशीने पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आरोपीला पकडून काळाचौकी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पोलिसांच्या ताब्यात देण्यापूर्वी आरोपीला चोप देण्यात आला होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. (POCSO)
(हेही वाचा – ‘एक भारत सर्वोत्तम भारत’, ध्येय गाठणे शक्य; Om Birla यांचा ठाम विश्वास)
दरम्यान काळाचौकी पोलिसांनी आरोपी आरिफ कुरेशी विरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ (पोक्सो) चा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. ४ दिवसांच्या पोलीस कोठडी नंतर कुरेशीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती आणि २० सप्टेंबर रोजी कुरेशी याची आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. २१ सप्टेंबर रोजी कुरेशी हा आर्थर रोड तुरुंगात असताना त्याला फिट आली होती, त्या दिवशी त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले होते.
२२ सप्टेंबर रोजी पुन्हा त्याला फिट आल्याने त्याला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी कुरेशी याचा मृत्यू झाला असल्याची माहिती आर्थर रोडचे अधीक्षक हर्षद अहिरराव यांनी दिली. कुरेशी याला अंमली पदार्थांचे व्यसन होते, त्याला तुरुंगात किंवा पोलीस कोठडीत अंमली पदार्थ न मिळाल्यामुळे त्याला फिट आली होती अशी माहिती तुरुंग अधिकाऱ्याने दिली. कुरेशीच्या मृत्यूप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. (POCSO)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community