अनिल देशमुखांच्या आधीही अनेकांबाबत केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर झाला आहे. त्याची आम्हाला चिंता वाटत नाही. तसेच त्याला महत्व देण्याचीही गरज नाही. यापूर्वीही देशमुख यांच्या घरावर छापेमारी करत त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्यात आला. आमच्यासाठी हे नवे नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी ईडीने छापेमारी सुरु केली. त्यावर पवारांनी भाष्य केले.
नैराश्यातून दिला जातोय त्रास!
अनिल देशमुखांच्या कुटुंबीयांवर, त्यांच्या मुलाच्या व्यवसायावर केंद्राने लक्ष ठेवले, परंतु हाती काही लागत नाही. त्या नैराश्यातून हा त्रास देण्याचा प्रयत्न आहे. त्याबद्दल यत्किंचितही चिंता नाही, तसेच त्याला महत्व देण्याचीही गरज नाही. जो विचार आपल्याला मान्य नाही, तो विचार दडपण्याचा प्रयत्न ईडी सारख्या यंत्रणांकडून होत आहे, हे अनेक राज्यात होत आहे. लोक सुद्धा गांभीर्याने नोंद घेत नाहीत, असेही पवार म्हणाले.
(हेही वाचा : देशमुखांवरचा ‘तो’ आरोप आणि त्यानंतरचा संपूर्ण घटनाक्रम कसा आहे? वाचा…)
काँग्रेसला शुभेच्छा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पोटोले यांनी आपला स्वबळाचा नारा सुरुच ठेवला आहे. त्यावर बोलताना प्रत्येक पक्षाला संघटना वाढवण्याचा अधिकार आहे. आमची काहीच तक्रार नाही, कार्यकर्त्यांची उमेद वाढवण्यासाठी आम्ही सर्व बोलत असतो, काँग्रेसचाही तो अधिकार आहे, असे पवार म्हणाले.
कॅन्सर रुग्णांच्या नातलगांचा प्रश्न मिटला!
टाटा रुग्णालयाला म्हाडाच्या सदनिका देण्यावरून वाद झाल्यानंतर त्याबाबत पर्यायी व्यवस्था झाली आहे. त्याची काही अडचण नाही. टाटा हॉस्पिटल देशातील एक नंबरचे कॅन्सर रुग्णालय आहे. तिथे राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येतात. जितेंद्र आव्हाडांना तिथल्या डॉक्टरांनी नातेवाईकांच्या राहण्याबाबत प्रश्न मांडला होता. म्हणून म्हाडाच्या सदनिका दिल्या, परंतु त्याला विरोध झाल्याने पर्याय जागा दिली आहे , त्यामुळे या वादावर पडदा पडला आहे, असेही पवार म्हणाले.
मराठा आरक्षणावर केंद्राने भूमिका घ्यावी
मराठा आरक्षणाच्या खोलात गेलो नाही, राज्य सरकारची चर्चा सुरु आहे, त्यातून मार्ग निघावा, मात्र ही अस्वस्थता दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्राने भूमिका घ्यावी, असेही पवार म्हणाले.
(हेही वाचा : अनिल देशमुखांच्या घरावर पुन्हा ईडीची छापेमारी )
Join Our WhatsApp Community