लोकल प्रवासाचा गोंधळ सुटता सुटेना!

पावसाळी अधिवेशनानंतर खरंच लोकल सुरू होणार का? की ती फक्त नेहमी प्रमाणे चर्चाच राहणार?

150

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वसामान्यांसाठी लोकलचा प्रवास बंद करण्यात आला असून, लोकल प्रवास कधी सुरू होणार, याची उत्सुकता सर्वसामान्यांना लागली आहे. लोकल सुरू करण्याबाबतचा गोंधळ अजूनही सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाचा गोंधळ ठाकरे सरकार कधी सोडवणार, असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडू लागला आहे.

अधिवेशनानंतर लोकल सुरू होणार का?

मुंबई लोकलमधून प्रवास करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना येत्या आठवड्यात दिलासा मिळण्याची शक्यता दोन दिवसांपूर्वीच वर्तवण्यात आली होती. लोकल प्रवासासाठी तीन टप्पे तयार करण्यात येत असून, महिला आणि दिव्यांग प्रवाशांना लवकरच लोकल प्रवासाची मुभा मिळण्याचे संकेत देण्यात आले होते. तर सर्वांसाठी पावसाळी अधिवेशनानंतर लोकल सेवा सुरू करण्यात येणार, अशीही माहिती समोर येत होती. मात्र आता डेल्टा प्लसच्या संभाव्य धोक्यामुळे राज्य सरकारचा इरादा बदलल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनानंतर खरंच लोकल सुरू होणार का? की ती फक्त नेहमी प्रमाणे चर्चाच राहणार, असा प्रश्न मात्र सर्वसामान्यांना आता पडू लागला आहे.

(हेही वाचाः ठाकरे सरकारमुळे सर्वसामांन्यांना करावा लागतो ‘हा’ गुन्हा)

आता तर युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासची चर्चा

एकीकडे पावसाळी अधिवेशनानंतर सर्वसामान्य चाकरमान्यांसाठी लोकल प्रवास सुरू होईल, अशी चर्चा सुरू असताना आता युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासची देखील चर्चा सुरू झाली आहे. बनावट ओळखपत्राच्या आधारे रेल्वेत होणारी घुसखोरी रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, लोकलची गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. युनिव्हर्सल ट्रॅव्हल पाससाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तयार केलेल्या ऑनलाईन सिस्टीमवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आपली माहिती सादर करावी लागणार आहे. त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांची माहिती तपासून मोबाईलवर क्यू-आर कोड ओळखपत्र पाठवण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.