-
ऋजुता लुकतुके
आगामी टी-२० महिला (Women’s T20 World Cup) विश्वचषकासाठी मैदानावरील पंच, तिसरे पंच आणि सामनाधिकारी यांचं पॅनल आयसीसीने शनिवारी जाहीर केलं. यात दोन नाव भारतीय आहेत. जीएस लक्ष्मी या सामनाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. तर वृंदा राठी पंच असतील. या स्पर्धेसाठी आयसीसीने १३ जणांचा महिला पॅनल जाहीर केलं आहे. येत्या महिन्यात ३ ते २० ऑक्टोबर दरम्यान संयुक्त अरब अमिरातीत ही स्पर्धा पार पडणार आहे. आधीच्या २०२३ मध्ये पार पडलेल्या महिला विश्वचषका दरम्यानही या दोघी आयसीसीच्या पॅनलचा भाग होत्या. यावेळी पॅनलमध्ये ३ सामनाधिकारी आहेत. तर १० पंच आहेत.
या स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान हा महत्त्वाचा सामना ६ ऑक्टोबरला दुबईत होणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या ॲलॉईस शेरिडन आणि दक्षिण आफ्रिकेच्या लॉरेन एगनबॅग या मैदानावरील पंच असतील. तर वेस्ट इंडिजच्या जॅकलिन विल्यम्स या टिव्ही पंच असतील. या स्पर्धेचा पहिला सामना ३ ऑक्टोबरला स्कॉटलंड आणि बांगलादेश दरम्यान होणार आहे. त्या सामन्यात क्लेअर पोलोसॅक आणि एगनबॅग या मैदानावरील पंच असतील. (Women’s T20 World Cup)
भारतीय संघ आपला पहिला सामना ४ ऑक्टोबरला न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात विल्यम्स आणि इंग्लंडच्या ॲना हॅऱिस या मैदानावरील पंच असतील. तर टिव्ही पंच असतील पोलोसॅक. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीच्या सामन्यांसाठीचे पंच आणि रेफरी यांची निवड ही स्पर्धेच्या पुढील टप्प्यात केली जाईल. महिलांचा टी-२० विश्वचषक सामना खरंतर आधी बांगलादेशला होणार होता. पण, तिथल्या अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे आता तो संयुक्त अरब अमिरातीत दुबई व शारजा या दोन शहरांमध्ये होत आहे. (Women’s T20 World Cup)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community