Mumbai University Senate Election : भाजपाने केला युवा सेनेचा विजय मोठा; मग गुलाल उधळणारच ना !

भाजपाच्या प्रत्येक वॉर्ड अध्यक्षांसह माजी नगरसेवकांच्या मदतीने जर अभाविपने मतदारांची नोंदणी केली असती आणि प्रत्येक उमेदवारांच्या मतदानाचे नियोजन केले असते तर आज वेगळा निकाल पहायला मिळाला असता

129

– सचिन धानजी

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा अर्थात सिनेट सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीत (Mumbai University Senate Election) उबाठा शिवसेनेच्या युवा सेनेने गुलाल उधळला. उबाठा युवा सेनेचे दहाही सदस्य निवडून आले आणि त्यांनी आभविपला क्लिन स्वीप दिला. त्यामुळे सर्वच्या सर्वच जागांवर उमेदवार निवडून येणे याचा आनंद असणे आणि तो आनंद व्यक्त करणे हा त्यांचा अधिकार आहे. त्या गुलालावर युवा सेनेचाच अधिकार होता. सिनेटच्या या निवडणुकीच्या विजयाचा गुलाल हा कधीच अभाविपचा नव्हता. कारण या निवडणुकीत शिवसेना युवा सेनेने आपले उमेदवार उभे केले नव्हते की आजवर कडवे आव्हान देणाऱ्या मनसेने उमेदवार दिले नव्हते. त्यामुळे समोर आव्हानच नसल्याने उबाठा युवा सेनेचे दहाही जागा निवडून येणार हे आधीच स्पष्ट झाले होते. मात्र, त्यांच्या विजयाचा उल्हास अभाविपने वाढवला एवढाच.
मुळात जिथे पदवीधर मतदार संघातून अनिल परब हे  निवडून आले होते आणि भाजपाचे (BJP) किरण शेलार पडले होते, त्यातच सिनेटचा निकाल स्पष्ट होतो. परंतु सिनेटची निवडणूक (Mumbai University Senate Election) मोठी करण्याचे काम भाजपाने केले. जर भाजपाला अभाविपची ताकद वाढवायची नव्हती, त्यांच्या पाठिशी राहायचे नव्हते तर मग त्यांना हवा देऊन त्यांचे उमेदवार केवळ पराभवासाठी का उभे केले हा प्रश्न आहे.
युवा सेनेच्या दहाही उमेदवारांना सरासरी पाच हजारांपैक्षा जास्त मते मिळाली, त्या त्यातुलनेत अभाविपच्या उमेदवारांना सरासरी ८०० मते. जर आपण पदवीधर मतदारच गोळा करू शकलो नाही, तर प्रत्येक उमेदवारांना कुणी मतदान करावे याचे नियोजन तरी कुठून करणार? युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि युवा सेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांनी प्रत्येक शाखांमधून सिनेट उमेदवारांना मतदान करण्यासाठी मतदारांचे अर्ज नव्याने भरुन घेत मतदारांची जमावजमव केली, एवढेच नाही तर दहाही उमेदवारांना कोणत्याही विधानसभा मतदार संघातून मतदान केले जाईल, त्या मतदारांनी कुठल्या उमेदवाराला मतदान करायचे आहे याचे सुक्ष्म नियोजन केले. त्याचा परिणाम मतदानात दिसून आला. अभाविपचा जो एकमेव सदस्य निवडून येईल अशी आशा होती, तोही निवडून आला नाही, ती असली नसलेली आशा या निकलाने संपुष्टात आली. (BJP)

अभाविपला नवीन मतदारांची नोंदणी करता आलेली नाही

एकवेळ असा होता की, अभाविपमध्ये काम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते होते. विनोद तावडे, आशिष शेलार, पराग अळवणी आदी सर्व अभाविपमधून भाजपला (BJP)  मिळालेले चेहरे आहेत. भाजपामध्ये सध्या असलेले प्रविण दरेकर, काँग्रेसचे सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड हे विद्यार्थी चळवळीतून पुढे राजकारणात आले. परंतु राज्यात आणि देशात सत्ता आल्यानंतर भाजपाला या विद्यार्थी चळवळीचा विसर पडला. सत्तेच्या डोहात भाजपा एवढे डुबले गेले की त्यांना पक्षाची भावी ताकद ही तरुणाई असून या तरुण पिढीला विद्यार्थी दशेपासून आपल्याकडे वळते करण्यासाठी त्यांचा काहीच प्रयत्न करावेसे वाटत नाही. पन्ना प्रमुख बनवून निवडणुकीचे काम करण्यासाठी कार्यकर्ते जमवता येईल, पण या विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून पक्षाचे हार्डकोर कार्यकर्ते निर्माण करावे, याची आता भाजपाला गरज वाटत नाही.
राज ठाकरे हे भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष म्हणून प्रथम राजकरणात नावारुपाला आले. पुढे राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद अभिजित पानसे यांच्याकडे सोपवण्यात आले. परंतु पुढे आदित्य ठाकरे यांना पक्षात आणल्यानंतर त्यांना विद्यार्थी चळवळीत सहभागी करून घेण्यासाठी आणि त्यांचे नेतृत्व सोपवण्यासाठी युवा सेनेची स्थापना केली. त्यामुळे सन २०१०मध्ये जेव्हा सिनेटची निवडणूक (Mumbai University Senate Election) झाली होती. तेव्हा ठाकरेंच्या युवा सेनेने दहा पैकी आठ जागांवर सदस्य निवडून आणले होते. हा आदित्य ठाकरे यांचा मोठा विजय होता. त्यानंतर ही निवडणूक पाच वर्षांनी म्हणजे २०१५ला होणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात ही निवडणूक लांबणीवर पडून २०१८मध्ये झाली. त्यातही शिवसेनेलाच यश मिळाले होते. त्यानंतर ही निवडणूक २०२२ रोजी होणे अपेक्षित असताना दोन वर्ष लांबणीवर पडून प्रथम फेब्रुवारीत होणार होती, परंतु सरकारने ती लांबणीवर टाकल्याने आता होत आहे. त्यातही ही निवडणूक न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार होत आहे. त्यामुळे आधीच भाजपा (BJP) निवडणूक घ्यायला बघत नव्हती, त्यातच मतदार यादी रद्द करून नव्याने नोंदणी करण्यास भाग पाडूनही भाजपाच्या अभाविपला नवीन मतदारांची नोंदणी करता आलेली नाही. भाजपाच्या प्रत्येक वॉर्ड अध्यक्षांसह माजी नगरसेवकांच्या मदतीने जर अभाविपने मतदारांची नोंदणी केली असती आणि प्रत्येक उमेदवारांच्या मतदानाचे नियोजन केले असते तर आज वेगळा निकाल पहायला मिळाला असता. पण भाजपाने कुठेही सत्तेचा वापर यासाठी केला असे दिसून येत नाही. किंबहुना अभाविपचे पदाधिकारी गाफिल राहिले, त्याचा परिणाम निकालावर दिसून आला, असेच म्हणता येईल.

तर गुलालाचा रंग फिका पडला असता

मुळात शिवसेनेच्या युवा सेनेला टक्कर देण्याची ताकद मनविसेमध्ये होती, परंतु या निवडणुकीत मनविसेने स्वारस्य न दाखवणे हाही संशोधनाचा विषय आहे. परंतु मनसेने ना अभाविपला पाठिंबा दिला, ना आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे उबाठा  शिवसेनेला. त्यामुळे मनसेच्या मतदारांनी शिवसेनेलाच मतदान केले नसेल कशावरून?  परंत हाच प्रश्न उपस्थित होतो की जर अधिकृत शिवसेना आपलीच आहे आणि युवा सेना आमची आहे असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार एकनाथ शिंदे तसेच युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक करत असले तरी प्रत्यक्षात त्यांनी आपला एकही उमेदवार उभा न करणे आणि यासाठी एकही मतदार नोंदणी न करणे हाच मुळी आपला रणांगणात न उतरता पराभव स्वीकारण्यासारखा आहे. जर शिवसेनेच्या युवा सेनेने आणि मनसेने यासाठी तयारीनिशी मैदानात आपले उमेदवार उतरवले असते तर शिवसेना भवन बाहेरील आणि मातोश्रीबाहेरील गुलालाचा रंग फिका पडला असता.
पण या विजयाचा एवढा उन्माद वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे यांनी एवढा दाखवला की जणू काही विधानसभा निवडणुकच जिंकलो. शिवसेना भवन आणि मातोश्री बाहेर गुलाल उधळत आता विधानसभेत असेच असेच चारीमुंड्या चित करू अशा वल्गना करण्यास सुरुवात केली. पण सिनेट निवडणूक आणि विधानसभा निवडणूक याचा कोणताही संबंध नसून सिनेट (Mumbai University Senate Election) जिंकली म्हणजे विधानसभा जिंकतील आणि राज्यात सरकार येईल अशी जी आही सप्न रंगवली जात आहे, ती प्रत्यक्षात यायला खूप पापड लाटावे लागणार आहे. मतदारांचा कौल कुणाला असेल हे त्यावेळी स्पष्ट होईलच, पण सिनेट च्या विजयाने जर उबाठा शिवसेनेला आनंदाचे उमाळे फुटत असतील तर त्यांच्यासाठी ही धोक्याची सूचना आहे, एवढंच मी म्हणेन.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.