घर नाही तर मत नाही, पोलिस परिवाराचा निर्धार

आता हक्काच्या घरांसाठी पोलिस परिवार रस्त्यावर उतरला आहे.

135

उत्तर प्रदेश, बिहारमधील परप्रांतीयच नव्हे तर बांग्लादेशीसुद्धा मुंबईत येऊन झोपड्या बांधतात आणि त्यांच्याही झोपड्या नावावर होतात. मग पोलिसांच्या नावावर घरं का होत नाहीत? जोपर्यंत बीडीडी चाळीतील घरं पोलिसांच्या नावांवर होत नाहीत, तोवर हक्काच्या घरांसाठी सुरू असलेला पोलिस परिवाराचा लढा सुरूच राहील, असा निर्धार रविवारी पोलिस परिवारांनी केला आहे. एवढंच नव्हे तर पोलिसांच्या वरळीतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा ताटकळत राहिलेला प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत मतदान करणार नसल्याचीही भूमिका पोलिस परिवाराने घेतली. हक्काच्या घरांसाठी पोलिस पुत्रांच्या लढ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला लेखी पाठिंबा जाहीर करत या लढ्याला बळ दिले आहे.

पोलिस परिवाराची चळवळ

मुंबईच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या पोलिसांना बीडीडी चाळीतील घरांबाबत अनेक राजकीय पक्षांनी आजवर केवळ आश्वासनांचीच गाजरं दाखवली आहेत. पोलिसांच्या घरांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून कुणीही ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या बीडीडी चाळीतील घरांचा प्रश्न सुटावा म्हणून पोलिस परिवारांनी पुढाकार घेऊन “घरं नाही तर, मतं नाही” ही नवी चळवळ सुरू केली आहे. त्यानिमित्ताने आयोजित बैठकीत रविवारी सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.

(हेही वाचाः कुणी लोकल सुरू करता का? लोकल…)

मनसेचा पाठिंबा

पोलिसांच्या हक्काच्या घरासाठी सुरू असलेला लढा यापुढेही सुरूच राहणार. पोलिस कुटुंबांच्या जोरावर अनेक राजकीय पक्ष मोठे झाले, अनेकांनी आपापल्या पोळ्या भाजल्या. पण आता एकाही राजकीय पक्षाला पोलिस परिवार मतांची भीक घालणार नाही. पुरे झालीत तुमची तोंडी आश्वासनं! आता हवा आहे लेखी पाठिंबा, असेही पोलिस परिवारातल्या तरुणांनी राजकीय पक्षांना ठणकावून सांगितले. पोलिस पुत्रांच्या या भावना कळताच मनसेचे विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांनी पोलिस परिवाराची भेट घेऊन त्यांना मनसेचा लेखी पाठिंबा जाहीर केला. मनसे प्रमुख राज ठाकरे नेहमीच पोलीसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत. आझाद मैदान दंगलीच्या प्रसंगी पोलिसांवर झालेला हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढणारा मनसे हा एकमेव राजकीय पक्ष होता. त्यामुळे पोलिसांच्या घराच्या लढ्यातही मनसे उतरणार असल्याचेही संतोष धुरी यांनी आश्वासन दिले.

ही लढाई जिंकणारच

पोलिस परिवाराच्या आजच्या बैठकीमुळे स्थानिक पातळीवरील राजकरण चांगलेच तापले. सर्व पोलिस परिवार एकत्र आले तर काहीही करू शकतात, हेच राज्य सरकारला दाखवून देण्याची वेळ आता जवळ आली आहे. आपण आजवर अनेक पक्षांचे झेंडे हाती घेतले, पण आता कुणाचाच झेंडा हाती नको. जो आपल्यासाठी लढणार तोच आपला. आताची लढाई ही पोलिस पुत्रांची लढाई आहे, पोलिस परिवाराची लढाई आहे. ही लढाई पोलिस परिवारच जिंकणार.

(हेही वाचाः नाशिकमध्ये रेव्ह पार्टीचा पर्दाफाश! 22 जणांवर कारवाई)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.