तिरुपती मंदिरातील लाडू भेसळ प्रकरणातील (Tirupati Laddu Prasad Adulteration) एसआयटी तपास तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे तपास पुढे ढकरण्यात आला आहे, असे आंध्र प्रदेशचे डीजीपी द्वारका तिरुमला राव यांनी मंगळवारी, १ ऑक्टोबर रोजी सांगितले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी नुकतेच तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर आरोप केला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी नऊ सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले होते.
काय म्हटले सर्वोच्च न्यायालयाने?
आंध्र प्रदेशचे डीजीपी द्वारका तिरुमला राव यांच्या सूचनेनुसार, तिरुपती मंदिरातील लाडू प्रसाद भेसळ (Tirupati Laddu Prasad Adulteration) प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने ३ ऑक्टोबरपर्यंत तपास तात्पुरता स्थगित केला आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत डीजीपी द्वारका तिरुमला राव म्हणाले की, एसआयटीच्या स्थापनेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर काल न्यायालयात सुनावणी झाली. आयजीच्या नेतृत्वाखाली आमच्या टीमने तिरुमला तिरूपती देवस्थानम् (टीटीडी) च्या विविध ठिकाणांना, खरेदीचे क्षेत्र, नमुना संकलन क्षेत्राला भेट दिली. टीमने लोकांची चौकशी केली आणि जबाब नोंदवले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने काही काळ थांबण्यास सांगितले आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत आम्ही काही काळ तपास थांबवला आहे, असे डीजीपी द्वारका तिरुमला राव यांनी सांगितले.
(हेही वाचा Congress : पवार आणि ठाकरेंकडे फक्त सहानुभूतीच; उमेदवारीसाठी मात्र इच्छुकांचा ओढा काँग्रेसकडेच)
दरम्यान, काल सर्वोच्च न्यायालयाने तिरुपती लाडू प्रसाद प्रकरणावर (Tirupati Laddu Prasad Adulteration) सुनावणी केली. यावेळी चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या विधानाबद्दल सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा. या प्रकरणाची चौकशी एसआयटीकडे असणार की, दुसरे कुणी करणार? भक्तांच्या भावना दुखावल्या जातील, असे विधान करायला हवं का? एसआयटी चौकशीचे आदेश दिलेले असताना विधान करण्याची गरज काय पडली? प्रथम दर्शनी लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असलेले तूप वापरले नसल्याचे दिसत आहे. कोणतेही ठोस पुरावे नसताना, चौकशी प्रलंबित असताना अशा पद्धतीचे विधान लोकप्रतिनिधीकडून केले जात असेल, तर त्याचा चौकशीवर काय परिणाम होईल?, अशी प्रश्नांची सरबत्ती सर्वोच्च न्यायालयाने केली. याचबरोबर, तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असलेले तूप वापरल्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.
Join Our WhatsApp Community